सोलापूर: एकीकडे सीमावाद वाढत असताना आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार होत सुरु असतानाच सोलापूर जिल्ह्यातील पानमंगरुळचे नागरिकांनी मात्र पुन्हा कर्नाटकात जाण्याचा ठराव करण्याचा धाडस केले आहे. त्यातच हे पानमंगरुळ गाव हे भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे यांचेच गाव असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पानमंगरुळचे नागरिक गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हैराण झाले असून त्याला कंटाळून आम्ही कर्नाटकात जाण्याचा ठराव केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
माजी खासदार शरद बनसोडे यांच्या पानमंगरुळसह गावासह सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातल्या 11 गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारसाठी ही आणखी एक डोकेदुखी वाढली असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पानमंगरूळ गावात रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून अद्यापही नीटनेटके रस्ते नसल्याचा ग्रामस्थांचा सरकारवर आरोप केला आहे.
त्यामुळे नागरिकांनी या रस्त्याला कंटाळूनच कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या भागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला मात्र रस्ते सुधारणा काही झालीच नाही असा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला आहे.
पानमंगरुळमध्ये रस्ता करण्याता आला आहे मात्र तो रस्ता हाताने उखडता येईल असे रस्ते बनवले जात आहेत. त्यामुळे आमचे हाल होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे आम्ही कर्नाटकात गेल्यावर आम्हाला किमान रस्ते, वीज आणि पाणी तरी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
– माजी खासदार शरद बनसोडे यांच्या 2014 ते 2019 या कार्यकाळातदेखील या गावाला रस्ता मिळाला नव्हता. त्यामुळे गावातील नागरिकांनी आता ठराव करून कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे.