सोलापूर : ग्रामीण भागात नृत्यांगणा गौतमी पाटील म्हटलं की मोठी गर्दी उफाळून येते. माडा तालुक्यातील पिंपळफुटा गावात त्या आल्या होत्या. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घाला अशी मागणी करण्यात आली. यावर गौतमी पाटील म्हणाल्या, ग्रामीण भागातील प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे. लोकांच्या प्रेमामुळं माझे कार्यक्रम व्यवस्थित चाललेत. मी एक कलाकार आहे. गावोगावी जाते नि कार्यक्रम साजरे करते. सुरुवातीला काही चुका झाल्या असतील. पण, आता सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे.
कोण काय बोलतं त्यावर मला काही बोलायचं नाही. मी माझी कला सादर करते. त्यात कोणत्याही प्रकारचा अश्लीलपणा नाही. मी स्टेजवर असताना खाली काय चाललं हे मला माहीत नसतं. कार्यक्रमाला किती लोकं येतील, हेही मला माहीत नसते. तरीही गौतमीमुळं काही झालं असं म्हणालं तर ते वाईट आहे, असंही गौतमी पाटील म्हणाल्या.
तुळजापूरला कार्यक्रम होता. अफाट गर्दी होती. त्या गर्दीतून निघणं अवघड होतं. पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली. पोलिसांनी त्यांच्यात गाडीत बाहेर सोडलं, असा एक किस्साही गौतमी पाटील यांनी सांगितला.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी नव्या नृत्यांगणांनी अश्लीलपणा करू नये, असं सांगितलं. लोककला जिवंत ठेवण्याचं आवाहन केलं होतं. अश्लीलपणा दाखविल्यास महाराष्ट्राचा बिहार व्हायला काही वेळ लागणार नाही, असं म्हंटलं. हा टोला त्यांनी नव्या कलावंतांना लगावला होता.
त्यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाल्या, त्या वयाने मोठ्या आहेत. त्यांचा तो अधिकार आहे. आम्ही अश्लीलपणा होणार नाही, याची नेहमी काळजी घेतो. यापूर्वी काही चुका झाल्या असतील. पण, यापुढं काही होणार नाही, यावर लक्ष देतो.