माढा (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणं हे काही तरुणांचे धेय्य असतं. कारण ही परीक्षा उत्तीर्ण होणारे तालुका तसेच जिल्हा स्तरावर अधिकारी म्हणून काम करतात. प्रतिष्ठेशिवाय चांगला पगारही मिळतो. त्यामुळे पदवी झाली की, काही विद्यार्थी याच्या तयारीला लागतात. काहींचे आईवडील नोकरीवर असल्यास ही परीक्षा उत्तीर्ण होणे त्यांना सोपे जाते. परंतु, बोटावर मोजण्याजोगे विद्यार्थी कठीण परिश्रम करून ही परीक्षा उत्तीर्ण होतात. असचं काहीस यश केदार बारबोले या युवकानं मिळवलं. त्यासाठी त्याला मदत झाली ती आईची. कारण केदार लहान असताना वडील गेले. आईनं केदारला शक्य ती मदत केली. हिंमत दिली. स्वतःच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केदार आता एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यामुळं गावकऱ्यांनी त्याची आईसह गावात मिरवणूकच काढली. यामुळे केदार भारावून गेला होता.
वडिलांच्या निधनानंतर तो खचला नाही. आईने वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन आणि स्वत: जिद्द, आत्मविश्वासाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत राज्यात ६ वा क्रमांक पटकावला. माढा तालुक्यातील दारफळ(सिना) गावातील केदार प्रकाश बारबोले असं प्रतिकुल परिस्थितीतून मार्ग काढत जिद्दीनं यश मिळवलेल्या त्या तरुणाचं नाव आहे. केदार आता पोलीस उपायुक्तपदी विराजमान होणार आहे. गावकऱ्यांनी केदारसह त्याची आई कुसूमची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्याच दिलेल्या परीक्षेत केदारने हे यश संपादन केले आहे.
माढ्यातील मनकर्णा पतसंस्थेत केदारचे वडील सायकलवरून कामाला ये जा करीत असायचे. केदार शालेय शिक्षण घेत असतानाच २००८ साली त्यांचे वडील प्रकाश यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतरही केदारने आईच्या पाठबळामुळे चांगले शिक्षण सुरू ठेवले. वडिलांच्या कष्टाचे भान ठेवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पहिल्यांदाच दिलेल्या परीक्षेत ५९३ गुण प्राप्त करुन ६ वा क्रमांक पटकावला. दोन पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या केदारने मिळवलेलं यश कौतुकास पात्र आहे.