सोलापूर: ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार (Global Teacher Prize) शिक्षक रणजितसिंह डिसले (Teacher Ranjitsingh Disale) यांना मागील वर्षी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यात आणि राज्याबाहेर झाली. त्यानंतर त्यांना पीएचडीसाठी परदेशाता जाण्यासाठी रजेचा मुद्दाही गाजला आणि त्यांच्या रजेचा विषय थेट तत्कालीन मंत्री शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत गेला होता, त्यानंतर त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली मात्र त्याआधी त्यांची चौकशी करण्यात येत होती त्या चौकशीबाबतचा अहवाल आता टीव्ही नाईनच्या हाती लागला आहे.
शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर चौकशी समिती नेमल्यानंतर त्या समितीने शिक्षक डिसले यांच्याविरोधात 5 सदस्यीय चौकशी समितीने (Inquiry Committee) ताशेरे ओढले आहेत. रणजितसिंह डिसले यांनी कागदोपत्री पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे देऊन आर्थिक पदभार हा स्वतःकडे ठेवून आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून येत असल्याचे त्यामध्ये नमूदे केले असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर हा आर्थिक व्यवहार हा नियमानुसार केल्याचे दिसून येत नसल्याचेही चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे.
कामकाजाचा कालावधी अनधिकृत
रणजितसिंह डिसले यांना प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी माढा यांनी दिनांक 18 डिसेंबर 2017 रोजी कार्यमुक्त केले असताना शिक्षक डिसले हे 5.फेब्रुवारी 2018 रोजी डायट वेळापूर या ठिकाणी हजर झाले होते.13 नोव्हेंबर 2017 ते 4 फेब्रुवारी 2018 या कालावधीतील कामकाज केल्याचे आदेश संबंधिताकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा कालावधी हा अनधिकृत असल्याचे दिसून येत आहे.
रणजितसिंह डिसले यांनी डायट वेळापूर याठिकाणी एकही दिवस उपस्थित राहून कामकाज केल्याचे दिसून येत नाही. तथापि हजेरी पत्रकावरही त्यांनी प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये उपस्थित असल्याबाबत एकही स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे त्यांनी डायट वेळापूर या ठिकाणी केलेल्या शैक्षणीक कामकाजाबाबत कोणताही कामाचा अहवाल कार्यालयाकडे दिला नाही त्यामुळे त्यांचा अहवाल उपलब्ध नाही.
नियुक्ती कालावधीत उपस्थिती नाही
रणजितसिंह डिसले यांची मुळ प्रतिनियुक्ती कालावधी दिनांक 17 नोव्हेंबर 2017 असून ते 13 नोव्हेंबर 2017 पासून शालेय कामी उपस्थित नव्हते तसेच ते 5 मार्च 2018 रोजी डायट वेळापूर कार्यालयात हजर झाले आहेत. 30 एप्रिल 2020 रोजी मुदत संपलेला असताना ते 1 मे 2020 रोजी त्यांच्या मुळ शाळेवर हजर होणे अपेक्षित असतानाही शिक्षक डिसले 6 ऑक्टोंबर 2020 रोजी शाळेवर हजर झाल्याचे दिसून येते. यावरुन 11 नोव्हेंबर 2017 ते 4.फेब्रुवारी 2018 व दिनांक 1 मे 2020 ते 5 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत शिक्षक डिसले यांनी कोठे काम केले याबाबत कोणतेही आदेश असल्याचे दिसून येत नाही.
श्री डिसले यांना डायट वेळापूर येथे प्रतिनियुक्तीने हजर होण्यासाठी नियमानुसार शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर डिसले यांनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा संपुर्ण पदभार तेथील सेवेने कनिष्ठ शिक्षकांना देणे आवश्यक असताना तसे न करता फक्त कागदोपत्री सही करण्यापुरता पदभार कदम यांना देण्यात आला होता. तर आर्थिक पदभार हा स्वतःकडे ठेवून आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आले आहे. हा आर्थिक व्यवहार हा नियमानुसार केल्याचे दिसून येत नाही असंही नमूद करण्यात आले नाही.
सोलापूर विज्ञान केंद्र याठिकाणी डिसले यांनी कामकाज केल्याचे खुलाशात नमूद केले आहे परंतु प्रत्यक्षात विज्ञान केंद्र सोलापूर या कार्यालयाची माहिती घेतली असता त्यांनी सोलापूर विज्ञान केंद्र येथे कामकाज केले असल्याचे कोणतेही कागदोपत्रावरुन दिसून येत नाही तसेच त्यांनी 485 पानी दिलेल्या खुलासा पाहता या कालावधीत हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केल्याचे दिसून येत नाही. त्यांनी दिलेल्या खुलाशावरुन हे कामकाज ऑनलाईन पध्दतीने केल्याचे दिसून येते परंतु त्यांना सदर काम ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत कोणतेही आदेश असल्याचे दिसून येत नाही.
जिल्हा परिषद सोलापूर व विज्ञान केंद्र सोलापुर यांच्यामध्ये झालेल्या MOU नुसार सदर उपक्रम हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांकरिता आहे. परंतु डिसले यांनी या उपक्रमाचे बाहेरील देशामध्ये अथवा जि.प. शाळे व्यतिरीक्त सादरीकरण केल्याने MOU मधील नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. याबाबत डिसले यांनी कोणतेही परवानगी वरिष्टाकडून घेतल्याचे दिसून येत नाही.
डिसले यांचे 13 नोव्हेंबर 2017 पासून 5 ऑक्टोबर 2020 या कालावधीत जि.प.शाळा कदमवस्ती (परितेवाडी), सोलापूर विज्ञान केंद्र, सिंहगड इन्टिस्टुट सोलापूर, डाएट वेळापूर यापैकी कोणत्याही ठिकाणी एन्ट्री, मस्टर, उपस्थिती पत्रक शेरेबुक, इत्यादी पैकी एक ही अधिकृत उपस्थिती पत्रक अथवा हजेरी नोंद उपलब्ध झालेले नाही. तसेच डिसले हे ही उपरोक्त कालावधीतील अधिकृत अभिलेखे सादर करु शकले नाहीत असंही अहवालात नमूद करण्यात आले आहे.