सोलापूर : काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या डायलॉगमुळे संपूर्ण महाराष्ट्र खळखळून हसला. यावर गाणीदेखील प्रसिद्ध झाली. या गाण्यांवर आज डिजेच्या तालावर तरुणाई नर्तन करते. त्याच डायलॉगचे प्रणेते असणारे आमदार शहाजीबापू पाटील आता पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील सोनके या ठिकाणी चक्क प्रवचन सांगण्यात रंगलेले दिसून येत आहेत. आपल्या रांगड्या वक्तृत्वाने महाराष्ट्रभर फिरणारे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) कीर्तन आणि प्रवचनाच्या फडात देखील तितक्याच लिलया पद्धतीने लोकांना खेळवून ठेवत आहेत. त्यामुळे रांगडेपणा ते सात्विकपणा असा आमदार शहाजीबापू पाटलांचा पंढरपूर येथे दिसणारा प्रवास हा निश्चितच कौतुकास्पद आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी देखील आमदार शहाजीबापू पाटील यांनी अनेक ठिकाणी प्रवचनं केली आहेत. ते उत्तम कीर्तनकार देखील आहे. मात्र हेच आमदार शहाजीबापू आता पुन्हा एकदा या प्रवचनामुळे चर्चेत येत आहेत. शहाजीबापू पाटील कीर्तन आणि प्रवचनात दंग दिसून आले. पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे प्रवचन दिलं.
शहाजीबापू म्हणाले, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भीती आहे. ऊस लावला यंदा तळ्यात पाणी येते की, नाही. तळ्यात पाणी भरलं. पण, ऊस कारखान्यात येते की नाही. ऊस तोडून मिळते की नाही. ऊस गेल्यानंतर चेअरमन ऊसाचे पैसे देतो की नाही. हा सगळ्यात मोठा सध्याचा विषय. हातात पैसा पडेपर्यंत काळीज टाप टाप करत राहते. चेहरा पडून जातो. विचार कसं काय सुरू आहे, तर बर असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ऊसाचा बिल निघाला नाही म्हणून तर काळीज कापरते. अशी मिश्किली शहाजीबापू पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांच्या सभेत हशा पिकला.