ई-बुकच्या जमान्यातही संत साहित्यातून वाचन चळवळ, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संत साहित्याची दुकाने सजली

| Updated on: Jun 19, 2023 | 7:21 PM

आषाढी एकादशीला या मूर्तींना मोठी मागणी असते. तसेच वारकरी संप्रदायातील महत्त्वाची पुस्तकं विक्रीसाठी ठेवण्यात येतात. सध्या डिजीटलचा जमाना असला तरी पुस्तकांची खरेदी पंढरपुरात आषाढी एकादशीला होते.

ई-बुकच्या जमान्यातही संत साहित्यातून वाचन चळवळ, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संत साहित्याची दुकाने सजली
Follow us on

रवी लव्हेकर, प्रतिनिधी, सोलापूर : वारकरी संप्रदायाची पंढरी म्हणजे पंढरपूर. या पंढरपुरात आषाधी एकादशीला वारकऱ्यांचा मेळा भरतो. यानिमित्त आतापासून तयारी सुरू झाली आहे. मूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. दगडाला योग्य आकार देऊन विठ्ठल रुख्मिणीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. आषाधी एकादशीला या मूर्तींना मोठी मागणी असते. तसेच वारकरी संप्रदायातील महत्त्वाची पुस्तकं विक्रीसाठी ठेवण्यात येतात. सध्या डिजीटलचा जमाना असला तरी पुस्तकांची खरेदी पंढरपुरात आषाढी एकादशीला होते.

संत साहित्याची दुकाने सजली

सध्याच्या डिजिटल इंडियाच्या युगात ई बुक स्टोरीज व्हिडिओज यांचा ट्रेंड आहे. मात्र अशातही पंढरपुरात आषाढी वारीच्या निमित्ताने संत साहित्याला मोठी मागणी येत असते. संत साहित्याच्या ठेवा आपल्या अंगणी रहावा. यासाठी प्रत्येक वारकरी भक्तांची धडपड असते. यासाठी आतापासूनच संत साहित्य ग्रंथ खरेदीची दुकाने सजलेली दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा

हरीपाठाच्या पुस्तकाची मागणी जास्त

वारकरी संप्रदाय हा नित्य विठ्ठल भक्ती आणि नित्य हरीपाठाचे पठण या पायाभूत नित्यक्रमांवर आधारला आहे. याच हरीपाठाच्या पुस्तकाची खरेदी पंढरपुरात आल्यावर प्रत्येक भाविक करताना दिसतो. हरीपाठ म्हणजे विठ्ठलाचा ज्ञानेश्वर माऊलींचा आणि पंढरीचा प्रसाद म्हणून भाविक आपल्या घरी घेऊन जात असतात. त्यामुळे संत साहित्य ग्रंथ विक्रीच्या दुकानातून या पुस्तकाचे हमखास खरेदी होते.

या पुस्तकांची होते खरेदी

याशिवाय ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, सार्थ भागवत, हरीविजय, चक्रधर स्वामींनी लिहिलेली पुस्तके, दासबोध अशा पुस्तकांची ही मोठी खरेदी होत असते. गोरखपूर गीताप्रेसच्या पुस्तकांनाही विशेष मागणी असते. आजमितीला पंढरपुरात केवळ ६ ते ७ पुस्तकांची दुकाने आहेत. पण, या दुकानांमध्ये वारीपूर्वी आणि वारीनंतरही संत साहित्य खरेदीसाठी मोठी लगबग असते. ई-बुक, पीडीएफ आणि ई स्टोरीचा जमाना असतानाही संत साहित्याच्या माध्यमातून वाचन चळवळ रुजली जात आहे.