लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अशात काही मतदारसंघातील लढतीकडे माहाराष्ट्राचं लक्ष आहे. माढा लोकसभा मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष आहे. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अशात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच माढ्यात भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेकडूनच तुमची तुतारी मोडली जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील कुटूबियांना भाजप पक्षाने विधानपरिषदेच्या सदस्य पदासह कारखान्याला मदत दिली. भाजपाने सर्व काही मोहितेंना सकारात्मक प्रतिसाद दिलेला असल्याने मोहिते-पाटील यांचा परिवार हाती तुतारी घेणार नाही. माढ्यात विजय हा भाजपचाच होणार आहे, असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवारांनी 2009 सालच्या माढ्याच्या निवडणुकीत खोटी स्वप्ने दाखवली. जनतेची फसवणूक केली. आता जेव्हा तुतारी येईल. तेव्हा जनता ती मोडल्याशिवाय राहणार नाही. विजयसिंह मोहिते पाटील यांचं नेतृत्व मोठं होईल. म्हणून शरद पवारांनी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेला केराची टोपली दाखवली, असा आरोप त्यांनी केला आहे.
शरद पवारांनी माढ्याचा विकास केला असता तर आता पर्यंत उमेदवार जाहीर करता आला असता. उमेदवारासाठी शोधा शोध करायची वेळ आली नसती.आयात उमेदवारी जरी शरद पवार गटाकडून आली तरी देखील निंबाळकर सज्जच असणार आहे, असं आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलं आहे.
मी कधीच राजकारणात शत्रुत्वाची भूमिका घेतली नाही. विजयसिंह मोहिते पाटलांची कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना व्हावी ही इच्छा होती. मात्र ती शासनाने बाजुला ठेवली. योजना पूर्ण करुन मोहिते पाटील कुटूंबाला धन्यवाद देणार आहे. माझ्या विरोधात उमेदवार द्यायला शरद पवारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत नेता मिळेना. आयात उमेदवार जरी आणला तरी मी निवडणुकीला सज्ज आहे, असंही रणजितसिंह निंबाळकर म्हणाले.