नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडली. यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांचा विजय झाला. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभव स्विकारावा लागला. मात्र या निवडणुकीत बुथ कॅप्चरिंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी बूथ कॅप्चर केलं होतं, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. विद्या चव्हाण यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी बूथ कॅप्चरिंग केलं होतं. माझ्यासोबत जे आता दोन जण आहेत ते याचे साक्षीदार आहेत. या मुद्द्याच्या तक्रारी सुद्धा केल्या आहेत. परंतु गृहखातं गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. आमच्यावर गुन्हा किंवा धोका निर्माण करायचं काम करू नये. धनंजय मुंडे यांच्या आदेशाने झालेलं गुन्हा आहे. निवडणूक आयोगाला जाब विचारला पाहिजे, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.
आम्हाला काही फटका बसत नाही शरद पवार गट किती मजबूत आहे. हे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलं आहे. तेव्हा नवाब मलिकांनी त्यांची सुटका करून घेण्यासाठी असं बोलत असतील. तर ते त्यांचा प्रश्न आहे, असं म्हणत नवाब मलिक यांच्या विधानावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
मुस्लिम धर्मात 2 पेक्षा जास्त मुले आणि एकापेक्षा जास्त बायका असतील. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, असं विधान प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. यावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. हे सरकार अशा प्रकारे हिंदू मुस्लिम भेदभाव निर्माण करत आहे. जर ती महिला आहे बहीण आहे. तर मुस्लिम असल्यास काय फरक पडतो. मुस्लिम हे देखील याच देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे सर्वांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, असं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.