ईव्हीएम विरोधात सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीमधील पहिला एल्गार पुकारला. उत्तम जानकरांना भरभरून मतदान झालेले असताना राम सातपुते यांना गावातून मतदान अधिक कसे? असा सवाल ग्रामस्थांनी करत बॅलेट पेपरचा आग्रह धरला. विरोधी गोटातील बडे नेत्यांनी या गावाला भेट दिली. त्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली. शरद पवार यांनी माळशिरससह राज्यातील ग्रामपंचायतींना बॅलेट पेपरवर मतदानाचा ठराव घेण्याचे आवाहन केले. तर या ग्रामपंचायतीने ईव्हीएमला समर्थन दिले.
ईव्हीएम समर्थनासाठी ही गावं मैदानात
पंढरपूर-पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ईव्हीएमला समर्थन जाहीर केले आहे. एकीकडे राज्यात ईव्हीएम हटावची मागणी होत असताना, या दोन तालुक्यातील प्रत्येकी एका गावाने ईव्हीएमच्या बाजूने ग्रामपंचायत ठराव घेतला आहे. ग्रामसभेत ईव्हीएम समर्थनाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या वाढदिवशीच या ग्रामपंचायतीने बहुमताने हा ठराव मंजूर केल्याचे समोर येत आहे. यावरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका चुरशीच्या होतील हे वेगळं सांगायला नको.
लक्ष्मी टाकळी ईव्हीएमच्या बाजूने
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ही ईव्हीएमच्या बाजूने मैदानात उतरली आहे. येथे शिवसेनेची सत्ता आहे. ईव्हीएमवर मतदान घेण्यात यावे की नाही, यासाठी चर्चा झाली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी हात उंचावरून ईव्हीएमवर मतदान व्हावे यासाठी संमती दिली. याविषयीचा ठराव मंजूर केला. मारकडवाडी ग्रामस्थांच्या भूमिकेविरोधात या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी भूमिका घेतल्याचे दिसून येते.
आबदारवाडी ईव्हीएम समर्थनात आली पुढे
पाटण तालुक्यातील आबदारवाडी ग्रामपंचायतीने ईव्हीएमच्या पारड्यात त्यांचे मत टाकले. ही ग्रामपंचायत वृक्ष संवर्धन आणि पर्यायवरणासाठी काम करते. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास कागदासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. ईव्हीएममुळे अशिक्षित लोकांचे मतदान बाद होत नाही, असा पवित्रा ठराव मंजूर करताना घेण्यात आला. राज्यातील ग्रामपंचायती अशा दोन्ही बाजूने ठराव घेतील तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका चुरशीच्या होतील हे वेगळं सांगायला नको.