मुंबईः वारकरी संप्रदायाच्या (Warkari Sampraday ) माध्यमातून अवयवदान चळवळ (organ donation Movement ) उभी केली जाऊ शकते, असा सकारात्मक निष्कर्ष ‘दोस्त’ (Dost NGO) या सामाजिक संस्थेने अलिकडेच आटोपलेल्या आषाढी वारीत केलेल्या सर्वेक्षणानंतर काढला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक वारकऱ्यांनी लगेच अवयवदान चळवळीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली असून उर्वरित वारकऱ्यांपैकी बहुतांश वारकरी भविष्यात या मोहिमेत सामील होण्यास इच्छूक असल्याचेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
अवयव दान ही काळाची गरज आहे हे ओळखून 2015 पासून धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशिओ-हेल्थ ट्रान्सफॉरमेशन अर्थात ‘दोस्त’ या संस्थेने पंढरपूर वारी दरम्यान अवयव दान जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
यावर्षी प्रथमच संस्थेने अवयव दान मोहिमेबाबत वारकरी व नागरिकांचे मत काय आहे हे जाणण्यासाठी प्रत्यक्ष वारी दरम्यान सर्वेक्षण केले. या सर्व्हेमध्ये 1244 वारकरी सहभागी झाले. यात सहभागी झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या 70 टक्के तर स्त्रीयांची 30 टक्के होती. सर्वे फॉर्म भरून घेण्याआधी सर्वांना अवयवदानाबाबत माहिती देण्यात आली होती.स्पेन या देशात अवयव दान ही लोकचळवळ बनली आहे. या देशात 1 कोटी लोकांमागे 340 लोक अवयव दान करतात. याउलट भारतात हे प्रमाण 1 कोटी लोकसंख्येमागे केवळ एक इतके कमी आहे. हे प्रमाण वाढवायचे असेल तर अवयव दान ही लोकचळवळ बनणे गरजेचे आहे, या हेतूने स्वतः अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ असलेले डॉ. कैलास जवादे यांनी त्यांच्या दोस्त या संस्थेच्या माध्यमातून वारीसह विविध जनसंपर्क माध्यमांचा अवलंब केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना अवयव दान व अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्तही केले आहे.
अवयव दानाविषयी सकारात्मक बदल या जनजागृती मोहिमेमुळे होईल का याबाबत आपले मत काय? असा प्रश्न विचारल्यानंतर होय निश्चित बदल होईल म्हणणारे 64 टक्के होते तर फक्त हो म्हणणारे २५ टक्के तर बदल घडू शकतो असे म्हणणारे दहा टक्के लोक होते.
अवयवदानाच्या या चळवळीत आपण सहभागी होऊ इच्छिता का? असा प्रश्न केल्यानंतर 52 टक्के जणांनी मोहिमेत सहभागी होण्यासाठी होकार दिला तर नंतर कधीतरी सहभागी होऊ असे म्हणणारे 45 टक्के होते.
आपण अवयव दानाचा संकल्प करण्यासाठी अर्ज करू इच्छिता का? असा प्रश्न विचारला असता होय म्हणणारे 57 टक्के तर नंतर कधीतरी संकल्पासाठी अर्ज करू म्हणणारे 31 टक्के होते. या विषयी चर्चेची गरज आहे असे म्हणणारे 8 टक्के तर नकार देणारे केवळ 4 टक्के होते.
आम्ही दोस्त संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात ज्या वारकऱ्यांनी अवयवदान चळवळीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांना आम्ही संपर्क साधणार आहोत. त्यांच्यासाठी विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबिर आयोजित करून त्यांना अवयवदानाबाबत सखोल माहिती देऊन ते इतरांना अवयवदानासाठी प्रवृत्त करू शकतील अशा पद्धतीने त्यांचे सक्षमीकरण केले जाईल. यासाठी शासनाने आर्थिक सहाय्य, सुविधा व इतर मदत करणे गरजेचे आहे. याबद्दल शासन नियुक्त समिती सदस्य या नात्याने आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असेही डॉ. जवादे म्हणाले.
दोस्तच्या वतीने 2015 पासून अवयव दान दिंडीच्या माध्यमातून वारीमध्ये जनजागृती केली जाते त्याचा खरोखर काही उपयोग होत आहे की नाही? हे जाणण्यासाठी अवयव दाना विषयी आपणास यापूर्वी काही माहिती होते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. पंढरपूरच्या वारीमध्ये काही प्रमाणात अशिक्षित आणि ग्रामीण भागातील लोक असतात असा समज आहे. मात्र या प्रश्नावर होय म्हणणारे 73 टक्के तर नाही म्हणणारे २७ टक्के होते. अवयवदान दिंडीमुळे वारकऱ्यांमध्ये अवयव दानाविषयी मोठ्या प्रमाणावर जाणीव निर्माण झाली आहे हेच या प्रश्नाच्या उत्तरातून सिद्ध झाले.