आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरीत विठूनामाचा जयघोष पाहायला मिळतोय. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त श्री आणि सौ. चंद्रकांत पुंडकुलवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी त्यांच्या समवेत श्री विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मानाचा वारकरी म्हणून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांना मिळाला. उदगीरमधील गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करणारे सगर दाम्पत्य गेली 14 वर्ष कार्तिकी वारी करत आहेत. त्यांना यंदाचा विठ्छल रूक्मिणीच्या पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे मानाचे वारकरी सगर दाम्पत्याला अश्रू अनावर झाले.
आज कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने आज अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत आणि सायली फुलकुंडवार यांच्या हस्ते महापूजा झाली. वारकरी प्रतिनिधी म्हणून उदगीरच्या सगर दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी निवडणुका शांततेत पार पडाव्यात. तसेच राज्यातील जनतेला सुख समाधान लाभावं. बळीराजाला सुखी ठेव, असं विठ्ठलाला साकडे घातल्यात आलं.
आज कार्तिक एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृहात झेंडू , शेवंती, कार्नेशियन, गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी ही सटावट केली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा झेंडूच्या फुलांसह विविध आकर्षक पाना फुलांनी सजवण्यात आला आहे. तसंच सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागांना देखील देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
पंढरपुरात आल्यावर चंद्रभागेत स्नान आणिक दर्शन विठ्ठलाचं… पंढरपूरमध्ये आल्यानंतर श्री विठ्ठल दर्शनाला ज्याप्रमाणे महत्व आहे. त्याच प्रमाणे चंद्रभागा स्नानालाही तेवढच महत्व आहे. त्यातच आज कार्तिक शुद्ध एकादशी असल्याने चंद्रभागेच्या स्नानाला वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लाखो भाविक चंद्रभागेत स्नानाचा आनंद लुटत आहेत. जवळपास सात लाख भाविक आज कार्तिक यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.