बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणावरून राज्यात संतापाची लाट उसळली. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्याविरोधात विरोधकांनी रान उठवल्यानंतर प्रकरणात त्यांच्या शरणागतीनंतर अटक झाली. मी राजीनामा का द्यायचा असे म्हणत मुंडे यांनी बाजू मांडली. तर खासदार प्रणिती शिंदे यांनी सध्यस्थितीवर सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. हे सरकार निगरगट्ट आणि अहंकारी असल्याचा घणाघात त्यांनी घातला. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपा सरकारवर टीका
दिवसाढवळ्या सरपंचांचे कोण होत आहेत. बीड, परभणी, बदलापूर यांसारख्या घटना वाढत आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा घणाघात त्यांनी घातला. लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मीक कराड पर्यंत आरोपीना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
कायदा सुव्यवस्था हातात घेतात त्यांना मुख्यमंत्री पाठीशी घालतात.पोस्टमार्टम रिपोर्ट वेगळा असतो आणि मुख्यमंत्री सभागृहात वेगळं सांगतात. या सर्व घटनांवरून मी मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करते, असे वक्तव्य त्यांनी केले. महाराष्ट्र हा पुरोगामी होता मात्र आज तोच मागे पडला आहे. महाराष्ट्रात महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत, दीनदलीत अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहे, असे खासदार शिंदे म्हणाल्या.
प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप
लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मीक कराड पर्यंत म्हणजे गुजरात पासून महाराष्ट्रापर्यंत व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा युपी बिहार करण्यात येत आहे. संतोष देशमुखांच्या मुलीने पोलीस संरक्षण मागितले मात्र तिला संरक्षण दिले नाही. म्हणजे बीडमध्ये प्रचंड दहशतीचा वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगार जेलमध्ये बसून मुलाखत देत आहेत. त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरांवर दबाव आणला जातो मग सामन्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल प्रणिती शिंदे यांनी केला.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
धनंजय मुंडे यांचा १०० टक्के राजीनामा घेतला पाहिजे, कारण ते यात आहे असे दिसते, असे शिंदे म्हणाल्या. काँग्रेसच्या काळात जेव्हा राजीनामे मागितले जायचे त्यावेळी नैतिकता स्वीकारून आम्ही राजीनामे देत होतो. लोकांच्या दबावा पोटी, दोष नसला तरी राजीनामे दिले जात होते मात्र हे निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे ते राजीनामा देणार नाहीत. लवकर हटतील असे दिसत नाही, अशी कडाडून टीका त्यांनी केली.
लाडक्या बहिणीमुळे महाराष्ट्र दिवाळखोर
लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे. लाडकी बहीण ह्या निवडणुकींसाठी चुनावी जुमला होता. त्यांनी तो व्यवस्थित खेळला. लाडकी बहीणमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत, तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.