सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गाव सध्या विरोधी पक्षांच्या ईव्हीएमविरोधी लढाचं केंद्रस्थान बनत चाललं आहे. विधानसभा निवडणुकीत निकालावर या गावातील लोकांना आक्षेप घेतला. उत्तमराव जानकर हे शरद पवार गटाचे उमेदवार या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र त्यांच्याच समर्थकांना झालेल्या मतदानावर शंका आहे. त्यामुळे मॉक पोलिंग (बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान) घेण्याचा निर्णय या गावातील गावकऱ्यांनी घेतला. मात्र पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आल्यानंतर हे मॉक पोलिंग झालं नाही. या गावात आज शरद पवार गेले होते. त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर माळशिरसमधील भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली.
काँग्रेसेचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी ईव्हीएमच्या विरोधात रॅली काढणार आहेत. याच मारकडवाडी गावातून राहुल गांधी या रॅलीला सुरुवात करणार आहेत. यावर राम सातपुते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी मारकडवाडी गावात यावं. पण आजच्या प्रमाणे दम दिला गेला तर आम्ही गप्प बसणार नाही.आम्ही फांद्या हाणणार नाही, तर थेट खोडावर घाव घालू, असा इशारा राम सातपुते यांनी दिला आहे.
राम सातपुते यांनी बोलताना मोहिते पाटलांवर निशाणा साधला आहे. मोहिते पाटलांना संघर्ष पाहिजे असेल तर भाजप कार्यकर्ते संघर्ष करायला तयार आहे. शरद पवार आणि त्यांची टोळी ही निवडणूक जिंकल्या की लोकशाही जिंकली आणि हारले की EVM घोळ असं बोलतात, अशा शब्दात राम सातपुतेंनी शरद पवार आणि मोहिते पाटलांवर निशाणा साधला आहे.
आज शरद पवार यांची जी सभा झाली या सभेला बाहेरून लोक आणल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला आहे. शरद पवार साहेबांच्या सभेला बाहेरून लोक आणले होते. आजच्या सभेला मोहिते पाटलांच्या कारखान्यातील गुंड होते. त्यांनी आमच्या कार्यकर्त्याना धमक्या दिल्या. मोहिते पाटलांविरोधात आम्ही संवैधानिक लढा देणार आहोत. पण आम्हीही मारकडवाडीत भाजपची सभा करू, असं राम सातपुतेनी म्हटलं आहे.
अकलूजमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांचा अकलूजमध्ये न भूतो न भविष्यती नागरी सत्कार करणार आहोत. दोन दिवसात आमचा गोपीचंद पडळकर मारकडवाडीत येत आहेत, असंही राम सातपुतेंनी म्हटलंय.