पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक असे जोरदार युद्ध रंगले आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर काल खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. त्यावरूनच आता राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.कालच्या प्रकरणामुळे राजकीय वाद सुरु झालेला असतानाच आज पुन्हा एकदा रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना धृतराष्ट्र बनवले असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. यावेळी त्यांना सांगितले की, हातकणंगले आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागा आपण भाजपाकडे मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पंढरपूर येथे पत्रकारांना माहिती देताना ही मागणी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या मागणीवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सदाभाऊ खोत यांनी यावेळी खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाभारतामध्ये संजय आणि धृतराष्ट्राला रणांगणावरील माहिती देण्याचे काम केले होते,
मात्र आता कलियुगात संजय राऊत चांगले असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना धृतराष्ट्र बनवत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची बोचरी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राऊत यांच्यावर केली आहे.
तसेच संजय राऊत यांनी आम्हाला अस्तित्व नसलेले पक्ष म्हणून हिणवले होते मात्र त्याच संजय राऊत यांच्या पक्षाची आज काय अवस्था झाली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांचे शिवसेना ही महाविकास आघाडी नसून महाग चोरांची टोळी आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. जागा वाटपाच्या चर्चा नसून वाटणीची चर्चा सुरू असल्याची खोचक टोलादेखील यावेळी खोत यांनी त्यांना लगावला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांच्या नंतर आता रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी देखील दोन लोकसभेच्या जागांवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.
त्यामध्ये हातकणंगले मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे जागा वाटपामध्ये आपण मागणार असल्याची माहिती यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. त्यामुळे आता यावरून भाजप काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.