सोलापूर : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyaneshwar maharaj palkhi) सोहळ्यात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. जसजशी आषाढी एकादशी जवळ येत आहे, तसा वारकऱ्यांमधला उत्साह मधील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस याठिकाणी झाले. मोठ्या भक्तीमय वातावरणात रिंगणाला सुरूवात झाली. प्रारंभी पताकाधारी आणि वीणेकरी गोल रिंगणी धावले. तर त्यानंतर मानाच्या अश्वांनी रिंगणाच्या दोन फेऱ्या पूर्ण करत माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी माऊली… माउली… असा एकच गजर झाला. रिंगणातून वारकऱ्यांना पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने जाण्यासाठीची अधिक ऊर्जा मिळते आणि याच ऊर्जेचे द्योतक म्हणून रिंगणातील पारंपरिक खेळ फुगडी याला अधिक महत्त्व आहे. रिंगणानंतर हा सोहळा वेळापूर मुक्कामी जाऊन पोहोचला. उद्या गुरुवारी हा सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करून भंडीशेगाव (Bhandishegaon) मुक्कामी जाऊन पोहोचणार आहे.
वेळापूर येथील मुक्कामानंतर आज म्हणजेच गुरुवारी सात जुलैरोजी पालखी भंडीशेगावात असणार आहे. उद्या (8 जुलै) पालखीचा मुक्काम वाखरीत असणार आहे. तर 9 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. 10 जुलैला आषाढी एकादशीचा उत्साह असणार आहे. या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची ओढ असंख्य भाविकांना लागली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यासह राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यातर्फे आज सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत ऑनलाइन बैठक घेण्यात आली होती. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे निगराणी, गर्दीचे व्यवस्थापन, रुक्मिणी मंदिरात एक्झॉस्ट फॅन, शुद्ध पिण्याचे पाणी, गॅस उपलब्ध करून देण्याबरोबरच ठिकठिकाणी तात्पुरते शौचालय, महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, वेन्डिंग मशीन आदी सुविधा मिळणार आहेत. तर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज होणे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानाचा आराखडा, भक्त निवास आणि पंढरपूर शहराची स्वच्छता व नगरपालिकाबाबतचे प्रश्न या बैठकीदरम्यान चर्चिले गेले.