पंढरपूर : मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरात जुंपली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली होती. मात्र आता सत्ताधारी गटाकडून संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे वातावरण प्रचंड तापले आहे. त्यातच आता अयोध्या दौऱ्यानंतर ठाकरे गटाचा शिंदे गटाकडून समाचार घेण्यात येत आहे. आज मंत्री दीपक केसरकर यांनीही खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे.
पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी मंदिरात चांगल्या व्यक्तीचे नाव घ्या अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना उडवून लावले आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्यानंतर ठाकरे आणि शिवसेनेचा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटाने शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यातच शिवसेना आणि चिन्ह चोरल्यामुळे त्याचे पाप धुण्यासाठी म्हणून हा गट अयोध्येला गेला असल्याची टीका त्यांनी केी होती.
त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, पांडुरंगाच्या मंदिरात चांगल्या व्यक्तीचे नाव घ्या असा टोाल त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
ही टीका करतानाच ते म्हणाले की, संजय राऊत यांनी तोंड उघडलं की काय बाहेर पडते असं म्हणत मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
टीकेला प्रत्युत्तर देऊन झाल्यानंतर त्यांनी राज्यातील शैक्षणिक धोरणाविषयीही चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, यावर्षीपासून राज्याचे शैक्षणिक धोरण बदलणार असून थोड्याच दिवसात नवीन शिक्षक भरती लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
खाजगी संस्थांची तयारी असेल तर शिक्षक संस्था ताब्यात घेण्याचा निर्णयही हे सरकार घेऊ शकते अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने काही आमदार नराज असल्याचे बोलले जात होते. त्याविषयीही त्यांनी चर्चा करताना म्हणाले की, सरकारमध्ये कोणीही आमदार नाराज नाही असं म्हणत त्यांनी नाराज आमदारांच्या विषयावर पडदा पाडला.
तसेच अयोध्या दौऱ्यावर आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासारखे सदस्य वैयक्तिक कामांमुळे आलेले नाहीत त्यामुळे त्याचा बाऊ करण्याची गरज नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.