मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, अशी विनंती भुजबळांनी केली. छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारसाहेब आणि छगन भुजबळ यांच्यात काय चर्चा झाली, याचा तपशील माझ्याकडे नाही. मी त्याची माहितीही घेतली नाहीये. सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणं आवश्यक असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
सरकारने दोन्ही बाजूला जी आश्वासनं दिली आहेत. त्या दिशेने सरकारने आता पावले टाकावीत. बैठकीचे गुऱ्हाळ कितीकाळ चालवणार आहात? जरांगे आणि ओबीसी यांच्याबरोबर सरकारकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चर्चा केलीय. यावेळी विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घेऊन बरोबर नेले असते तर आम्ही समजू शकलो असतो. मात्र विरोधी पक्ष म्हणून विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेत्यांना याचा तपशीलच माहिती नाहीये. मग चर्चा कशाची करणार? सरकारने याबाबत एखादा प्रस्ताव तयार केला असेल तर त्यावर चर्चा होऊ शकते, प्रस्ताव मांडला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.
अजित पवार गटाचे काही नेते जयंत पाटलांच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. माझ्या संपर्कात कोणी आमदार नाहीये. शरद पवारसाहेबांच्या ही संपर्कात आहेत की नाहीत, याबाबत मला माहिती नाही. आमचे जे निष्ठावंत कार्यकर्ते जे पवार साहेबांच्या अडचणीच्या काळात बरोबर राहिले त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढची पावले टाकतोय, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडी जगावाटपावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आकड्यांच्या तपशीलात मी जाणार नाही. माढ्यासाठी बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत. माळशिरसमध्ये फार नसून फक्त दोनच जणांची इच्छा आहे. सोलापूर शहर मध्यमध्ये तौफिक पैलवान, शहर उत्तर मधून महेश कोठे इच्छुक आहेत. आम्ही फक्त चर्चा केली आहे कोणालाही अर्ज भरायला सांगितलं नाही. महाविकास आघाडीची सध्या लाट आहे, जवळपास 170 च्या वरती जागा येतील, असा अंदाज जयंत पाटलांनी व्यक्त केला.