शरद पवार मारकडवाडीत जाणार, राहुल गांधी इथूनच मोर्चाची सुरुवात करणार; माळशिरस बनलं EVM विरोधी लढ्याचं केंद्र

| Updated on: Dec 08, 2024 | 7:54 AM

Sharad Pawar will visit Markadwadi Today : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज माळशिरसमधील मारकडवाडी गावचा दौरा करणार आहेत. या गावात ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवण्यात आला होता. आता आज शरद पवार या ठिकाणी जााणार आहेत. वाचा सविस्तर...

शरद पवार मारकडवाडीत जाणार, राहुल गांधी इथूनच मोर्चाची सुरुवात करणार; माळशिरस बनलं EVM विरोधी लढ्याचं केंद्र
शरद पवार मारकडवाडीला जाणार
Image Credit source: Facebook
Follow us on

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर महाविकास आघाडीकडून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला. तर काही नेत्यांकडून आणि सामान्य लोकांकडून देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात तर मॉक पोलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पोलिसांनी जमावबंदी लागू केली. त्यामुळे हे मॉक पोलिंग झालं नाही. त्यानंतर विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील लढ्याचं मारकडवाडी हे केंद्र बनत चाललं आहे. आज शरद पवार या गावाला भेट देणार आहेत.

शरद पवारांचा मारकडवाडी दौरा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज मारकडवाडी गावच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आज मारकडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. शरद पवारांच्या दौऱ्यासाठी मारकडवाडीत भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. तसंच हेलिपॅडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मारकडवाडी गावात मोठ्या प्रमाणात ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

मारकडवाडी ग्रामस्थांनी भाजपच्या राम सातपुतेंना मताधिक्य मिळाल्याने ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मतं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना 843 मतं मिळाली होती. गावकऱ्यांनी या आकडेवारीवर आक्षेप नोंदवत इतकं कमी मतदान उत्तम जानकारांना होऊ शकत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यानंतर मारकडवाडी गावाने बॅलेट पेपर पद्धतीने मतदान चाचणी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाने हा प्रयत्न हाणून पाडल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे विकास कामे केल्यानेच मतदान झाल्याचा दावा भाजपच्या राम सातपुते यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवार आजच्या दौऱ्यात काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मारकडवाडी बनलं ईव्हीएम विरोधी लढ्याचं केंद्र

विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. असं असताना राहुल गांधी हे ईव्हीएमच्या विरोधात लाँग मार्च काढणार आहेत. याची सुरुवात राहुल गांधी मारकडवाडीतून करणार आहेत. त्यामुळे माळशिरस मधलं मारकडवाडी ईव्हीएम विरोधी लढ्याचं केंद्र बनलं आहे.