नुकतंच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. असं असताना महाविकास आघाडीकडून वारंवार ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील लोकांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सोलापूरच्या माळशिरस विधानसभा क्षेत्रातील मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांकडून ही मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने विरोध करत गावात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावामध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना अधिक मतदान मिळाली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी ईव्हीएम संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेऊन वास्तव समोर आणण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांना नोटीस देण्यात आल्या असून गावात जमावबंदी लागू केली आहे.
मारकडवाडी गावचे गावकरी मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र नागरिक मतदान प्रक्रियेवर ठाम आहेत. लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा, मतदान प्रक्रिया होणारच असं म्हणत नागरिकांनी निर्धार बोलून दाखवला आहे.
मारकडवाडीत आज मतदान प्रक्रिया पार राबवण्यावर आमदार उत्तम जानकर ठाम आहेत. निवडणूक आयोगाला आम्हाला दाखवायचे आहे की ईव्हीएम पद्धतीमध्ये घोळ आहे. माजी आमदार विकास कामे केल्याचा दावा करतात मात्र प्रत्यक्षात इथे काहीही झालेलं नाही. राम सातपुते यांनी 21 कोटीची कामे केल्याचा दावा केला. मात्र त्यातले पावणे 21 कोटी गडप केले असावेत. लोकसभेला भाजपला 54 हजार मतं होती. मग आता 1 लाख 8 हजार मतं कशी मिळाली असा सवाल आहे. एकास एक पद्धतीने या ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा संशय वाटतो. प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे अशी आमची भूमिका आहे, असं उत्तम जानकर म्हणालेत.