सोलापूर : कर्नाटकात काँग्रेसला 22 वर्षांनंतर बहुमत मिळालं आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या 224 पैकी 137 जागा निवडूण आल्या आहेत. तर भाजपला 65, जेडीएसला 19 तर इतरांना 3 मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काँग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली करत आहे. अशात पक्षांतर्गत चर्चा आणि बैठका वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील महत्वाचा नेता बंगळुरूसाठी रवाना झाला आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सत्ता स्थापनेसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे बंगळुरूसाठी रवाना झाले आहेत.
सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कर्नाटक सरकार स्थापनेबाबत मोठी जबाबदारी आहे. राज्य सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पर्यवेक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदेंकडे जबाबदारी आहे. सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी शिंदे बंगळुरूसाठी रवाना झालेत.
बंगळुरूमध्ये गेल्यानंतर काय आणि कशा पद्धतीने निर्णय होतोय हे पाहून पर्यवेक्षक म्हणून निर्णय घेईल. पक्षांमध्ये सर्वांशी विचार विनिमय करून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा लागतो. काँग्रेस हाय कमांडशी बोलून निर्णय घ्यावा लागेल, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात होता. इंदिरा गांधींना अटक झाली. त्यानंतर त्या बाहेर आल्यावर देशातील लोकांनी त्यांना निवडून दिलं. मी कायम म्हणत होतो तसेच आता देखील झाले आहे. जनतेने काँग्रेसला पुन्हा निवडून दिले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झालाय. मी कर्नाटकच्या हुशार जनतेला धन्यवाद देतो, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी दोन नावं आघाडीवर आहेत. सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांची नाव चर्चेत आहेत. सिद्धारमैया हे कर्नाटक विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राहिले आहेत. तर डीके शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या रेस पाहायला मिळतेय. आता काँग्रेस हायकमांड कुणाच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा देतात हे पाहणं महत्वाचं असेल.
कर्नाटक विधानसभेत 224 मतदारसंघ आहेत. यातील 137 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपला केवळ 65 जागा जिंकता आल्या आहेत. तर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जेडीएसने 19 जागा जिंकल्या आहेत. यात आठव्यांदा आमदार झालेलेल शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे.