सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दलित समाजातील नेते कसे फसले हे आता लक्षात आलं, असं सुशीलकुमार शिंदे म्ङणालेत. कर्नाटकमध्ये काल काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेसला 137 जागा मिळाल्या आहेत. यावर सुशीलकुमार शिंदे बोललेत. कर्नाटकात काँग्रेसला मिळालेलं यश अनपेक्षित आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.
सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दलित समाजातील नेते कसे फसले होते हे आता लक्षात आलं. ते फसल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे किती नुकसान झाले हे लक्षात आलंय.यामुळे सुधारणा रोखली गेली हे आता त्यांच्या लक्षात आले. यापुढे बदल घडेल यात शंका नाही, असं सुशीलकुमार शिंदे म्हणालेत.
कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर सोलापूर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. बाईक रॅली काढत सुशीलकुमार शिंदे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात होता. इंदिरा गांधींना अटक झाली. त्यानंतर त्या बाहेर आल्यावर देशातील लोकांनी त्यांना निवडून दिलं. मी कायम म्हणत होतो तसेच आता देखील झाले आहे. जनतेने काँग्रेसला पुन्हा निवडून दिले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झालाय. मी कर्नाटकच्या हुशार जनतेला धन्यवाद देतो, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला कर्नाटकात 102 ते 104 पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र 137 च्या पुढे जागा मिळाल्या. आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे दावणगिरी जिल्ह्याची जबाबदारी होती. तिथे 8 पैकी 6 जागा काँग्रेसला मिळाल्या. 2024 ला जरूर परिवर्तन होईल याबाबत मला पूर्ण खात्री आहे, असंही सुशील कुमार शिंदे म्हणालेत.
महाविकास आघाडी बैठकच्या बैठकीवरही सुशीलकुमार शिंदे बोललेत. मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीला मला निमंत्रण होतं. मात्र मी जाऊ शकणार नाही. मात्र मी त्यांच्याशी फोनवर बोलेन, असं सुशीलकुमार शिंदे म्हणालेत.