सोलापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी सोलापुरात आहेत. सोलापुरातील होम मैदानावर ही सभा होत आहे. सोलापुरात बोलताना नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. माझ्या प्रिय सोलापूरकरांना मनापासून नमस्कार, जय जय राम कृष्ण हरी… सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण सुरु केलं. याच भाषणात पंतप्रधानपदावरून नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.
पूर्वीच्या सरकारने देशाला भ्रष्टाचार, आतंकवाद, कुकर्मात ढकलले होते. पहिल्या दोन टप्प्यात इंडिया आघाडीचा डबा गुल झाला आहे. तुमचा सेवक मोदी हा डोकं झुकवून तुमच्याकडे येत असतो. इंडिया आघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध सुरू आहे. ज्याचे नाव ठरलेले नाही. ज्याचा चेहरा ठरलेला नाही अशा लोकांच्या हातात देश देणार का?, असा सवाल मोदींनी केला आहे.
इंडिया आघाडीने नवा फॉर्मुला आणला आहे. पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा फॉर्मयुला आणला आहे. प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान करणार आहेत. नकली शिवसेनावाले म्हणतात आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत. एवढा मोठा देश पाच पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली चालू शकतो का? इंडिया गाडीला देश चालवायचा नाही तर मलई खायची आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे.
महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. ज्योतिबा फुले, डॉक्टर आंबेडकर असे महापुरुष दिलेत. काँग्रेसचे साठ वर्ष आणि मोदीचे दहा वर्षे लोकांनी पाहिले आहेत. मागील दहा वर्षात सामाजिक न्यायासाठी जेवढे काम झाले तेवढे स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत झाले नाही. काँग्रेसवाल्यानी SC, ST, OBC वर्गाला हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम केलेय. पण आपले हृदयाचे संबंध आहेत. आमच्या अहमदाबादमध्ये अनेक पद्मशाली समाजाचे लोक आहेत. दर आठवड्यातून एकदा तरी पद्मशाली समाजाच्या घरी मी जेवण केलं आहे. मी पद्मशाली समाजाच्या लोकांचे मीठ खाल्ले आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.