वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूरच्या बार्शीमध्ये स्थानिकांशी बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका केली आहे. बार्शीतील लोकांना माझा आवाहन आहे की भाजपाला मत देऊ नका. भाजपला मत दिले की तुमच्यावर धाडी पडल्या म्हणून समजा. नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्यापूर्वी एका व्यक्तीवर 26 रुपये कर्ज होते. मात्र ते आता 96 रुपये झाले असे जागतिक बँक म्हणते आहे. दारुड्याची नोकरी गेल्यावर तो काय करतो? तर तो चोऱ्या, माऱ्या करतो, घरातले सामान विकतो. त्यामुळे दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती सारखीच आहे. पुढील पाच वर्ष मोदीला दिले तर देश कंगाल करून टाकेल, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सोलापूरच्या बार्शीमध्ये सभा झाली. उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ बार्शीत जाहीर सभा झाली. बार्शीतील पांडे चौकामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला.
तुम्ही आंदोलन करा किंवा काहीही करा. देशात लोकशाही आहे पण पंतप्रधान यांचे वागणे हुकूमशाहासारखे आहे. स्वातंत्र्य गमवायचे असेल तर भाजपला मतदान द्या. सणामार्फत तुमच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचा प्रयत्न या सरकारने केला. पण माझा प्रश्न आहे की लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचा उद्देश काय? ताबा तेव्हाच घेतला जातो जेव्हा तुम्हाला गुलाम बनवायचे असेल. तुम्हाला गुलाम बनवायचा प्रयत्न सरकार करत आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
कोविडमध्ये थाळ्या वाजवायला लावले की नाही. आता तरुण पोरं पटापट मरत आहेत. कोव्हीड मध्ये ज्यांनी कोविशिल्ड किंवा रेमडेसिव्हिर घेतले ते पटापट मरत आहेत. WHO ने सांगितले की रिमडेसिवीर औषध वापरू नये, पण भारताने ते वापरले.कारण रिमडेसिवीरचा मालक गुजराती व्यक्ती आहे. सोनिया गांधी 2012 साली म्हणाल्या होत्या. मोदी हे मौत का सौदागर आहेत. मात्र कोव्हीड काळात ते खरं ठरलं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भारतातील 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. या 17 लाख कुटुंबाची मालमत्ता प्रत्येकी 50 कोटी रुपये होती. राज्यसभेच्या रेकॉर्डवर या गोष्टी आलेल्या आहेत. या लोकांनी नागरिकत्व सोडण्याचे कारण म्हणजे यांना मागितला गेलेला हप्ता. भारतातील 17 लाख हिंदू कुटुंबाने भारत का सोडला? माझा आरएसएसला सवाल आहे की 17 लाख हिंदू कुटुंब बाहेर का गेले? आरएसएसला हिंदू राष्ट्र बनवायचे होते, मग 17 लाख हिंदू लोक देश सोडून का गेले?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.