पंढरपूर | 21 मार्च 2024 : काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या वर्षीची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक करो या मरो अशी ठरणार आहे. या निवडणुकीत आपण योग्य मतदान नाही केले तर लोकशाही संपेल. तर संविधान संपेल शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाईल आणि निवडणुका ही संपवतील. आपल्याला जो मतदानाचा हक्क आहे तो देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी खेचून घेतील, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.
प्रभू श्रीराम सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु रामासोबत काम देखील महत्त्वाचं आहे. धर्मासोबत कर्म देखील महत्त्वाचा आहे. मोदींना एवढा अहंकार आहे की, प्रभू श्रीरामांच्या ऐवजी स्वतःची मूर्ती देखील लावायला ते तयार होतील, असा घणाघात प्रणिती यांनी केला आहे. भाजपवाल्यांना लोकशाही संपवायची आहे. जनावरांचे पाणी हिसकावून घेतले. लोकांच्या तोंडातला घास काढून घेतलाय. महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. पत्रकारांवर हुकूमशाही, कोर्टावर हुकूमशाही… ये देशात काय सुरु आहे?, असा सवाल प्रणिती यांनी विचारला आहे.
मागच्या दहा वर्षात जी तुमची फसवणूक केली तीही पुढे करणार त्यांचे आमदार खासदार ही खोटारडे आहेत. दहा वर्षात भाजपने विश्वासघात केलाय माझ्याकडे काही कारखाने सोसायटी नाहीत त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात जर कोणी बोललं तर त्यांना अलगद बाजूला काढले जाते पण मला कसली भीती नाही. मी कायम लोकांसाठी लढत राहणार, असा निर्धार प्रणिती शिंदेंनी बोलून दाखवला.
गेल्या 70 वर्षात जात-पात धर्म कधी मानला नाही. म्हणून देश पुढे गेला परंतु भाजपची लोक धार्मिक आधारावर मतदान करायला भाग पाडत आहेत. काम न करता फक्त धार्मिक आधारावर मतदान करायला प्रवृत्त करत असतील तर लोकशाहीला धोका निर्माण होतोय. आपल्या देशाला कीड लावायचा प्रयत्न ही लोकं करतायेत, असंही त्या म्हणाल्या.