सोलापूर: सोलापूर रेल्वे स्थानकामध्ये (solapur railway station) प्रवासी आणि आरपीएफ (RPF) जवानाच्या सतर्कतेमुळे रेल्वेने जाणाऱ्या दुसऱ्या एका प्रवाशाचा जीव वाचल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी रात्री 11.30 च्या सुमारास रेल्वे स्टेशनवरुन निघाली होती. यावेळी एक प्रवासी सहानंबर बोगीत चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी प्रवाशाचा हात निसटला, आणि त्यामुळे चालत्या रेल्वेतून ते पडत असतानाच सुरक्षा रक्षक असणारे अंकुश ओमाणे आणि एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव वाचवण्यात यश आले. हा सर्व प्रकार सोलापूर स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सोलापुरात रेल्वे पोलिस आणि प्रवाशाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा वाचला जीव pic.twitter.com/PU66Ri5LMP
— Mahadev Parvti Ramchandra (@mahadevpr) May 7, 2022
रेल्वे स्थानकातील सुरक्षा रक्षक अंकुश ओमाणे आणि एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे रेल्वेतून पडत असताना त्यांच्या मदतीमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. यावेळी रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या प्रवाशांनीही आरडाओरड केला. प्रवाशी रेल्वेला लटकत असताना आणि तो खाली पडत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्याला वाचवल्याने मोठा अनर्थ टळला.
रेल्वे प्रशासनाकडून चालत्या ट्रेनमधून चढू अथवा उतरु नका अशा सूचना वारंवार देण्यात येतात. तरीही काही प्रवासी रेल्वेच्या या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन प्रवाशांचा जीव जात असतो. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करताना रेल्वेच्या सुचनांकडे लक्ष दिले पाहिजे असे मत रेल्वे प्रशासानातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. ज्या सुरक्षा रक्षकांनी प्रवाशाचा जीव वाचवला आहे, त्यांचे प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.