सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सोलापूर | 20 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने महाविकास आघाडी आणि जागा वाटपावर शरद पवारांनी भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार का? याची मागच्या काहीदिवसांपासून चर्चा होतेय. यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत बोलणं झालं आहे. 48 जागापैकी ठिकाणी 35 जागांवर एकमत आहे. बाकीच्याबाबत चर्चा सुरू आहे, असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस आली आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अनिल देशमुख, संजय राऊत यांना जेलमध्ये टाकलं. पण कोर्टाने चार्जशीट पाहून मुक्तता केली. ईडी चा वापर हे सरकारचे हत्यार आहे. सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जातोय. रोहित पवारांना एकट्याला नाही. तर सर्वच नेत्यांना ईडीचा धाक दाखवला जातोय. पण आम्ही शांत बसणार नाही. आम्ही कोर्टात जाऊन लढणार आहोत, असंही शरद पवारांनी सांगितलं.
सोलापुरात बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी काय भूमिका होतात याकडे लक्ष होतं. या प्रकल्पाचं श्रेय आडम मास्तर यांना जातं. अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत.कालचा लोकार्पण झालेला प्रकल्प आडम मास्तर यांचा आहे. विधायक काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल चार चांगले बोलले असते तर बरं दिसलं असतं, असं शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थित होते. पण शहरातील औद्योगिकरण याबाबत विचार झाला पाहिजे. या नेत्यांची जबाबदारी आहे की, सोलापूर ही औद्योगिक नागरी होती. मात्र आता इथे उद्योग वाढला पाहिजे. कारण कामासाठी सोलापूर सोडून लोकांना बाहेर जावं लागतं, असंही शरद पवार म्हणाले.
शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आज एकाच व्यासपीठावर पहायला मिळतील. काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार आणि शिंदे उपस्थित आहेत.