सोलापूरच्या मारकडवाडी गावात शरद पवार यांनी आज भेट दिली आहे. यावेळी शरद पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला. मारकडवाडी या गावात मॉक पोलिंगचा (बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान) निर्णय घेण्यात आला. पण पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने हे मॉक पोलिंग झालं नाही. आज शरद पवार यांनी या गावाला भेट दिली. यावेळी मॉक पोलिंग ऐवजी नवा पर्याय मारकडवाडी गावच्या ग्रामस्थांना सुचवला.
तालुक्याच्या सर्व गावात ठराव करा. आम्हाला आम्हाला ईव्हीएमवर मतदान नको. जुन्यापद्धतीने मतदान करायचं आहे. त्या ठरावाची प्रत उत्तम जानकरांकडे द्या. आमच्याकडे द्या. त्यावर आम्ही निर्णय घेऊ. योग्य ठिकाणी पोहोचवू, असं शरद पवार म्हणालेत.
आपले आमदार जानकर आहे. त्यांना विनंती आहे याचं रेकॉर्ड आम्हाला द्या. जमावबंदीचंपण. इथे काय प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय घेतला त्याची माहिती आणि रेकॉर्ड. पोलिसांनी केलेल्या केसेसच्या रेकॉर्ड आम्हाला द्या. आम्ही या ठिकठिकाणी नेणार. महाराष्ट्रात निवडणूक आयोग. त्यांच्याकडे तक्रार देऊ. मुख्यमंत्री, पंतप्रधान, निवडणूक आयोगाकडेही तक्रार करू. हे कशासाठी? आपण म्हणतो म्हातारी मेल्याचं दुख नाही, काळ सोकावतो. निवडणूक यंत्रणांचा काळ एकदा सोकावला तर तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. सर्व माहिती घ्या, असं शरद पवार म्हणालेत.
मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसापूर्वी. त्याचं कारण तुमचं मतदान झालं. त्यानंतर तुमच्या मनात शंका आली. तुम्ही असं ठरवलं आपल्या गावात फेरमतदान घेऊ. ते अधिकृत नव्हतं. ते सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने ठरवलं. पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. हा तुमचा अधिकार होता. पण हा निर्णय तुम्ही घेतल्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली. कोणता कायदा असा आहे, असा सवाल पवारांनी मारकडवाडीतून विचारला आहे.
या ठिकाणी मी भाषण करतो. तुम्ही ऐकत आहेत. उद्या पोलीस खात्याने निर्णय घेतला मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. हा कुठला कायदा. असा कुठं कायदा आहे. तुम्हाला इथे जमायचं नाही. जमावबंदी. तुमच्याच गावात ही गंमतीची गोष्ट आहे. हे का केलं मला समजत नाही. संसदेचं अधिवेशन सुरू आहे. संसदेत आमच्यावतीने कोणी तरी मांडेल. आणि या प्रश्नाला वाचा फुटेल याची काळजी घेऊ, असंही पवार म्हणाले.