राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात आहेत. मारकडवाडीतील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला. पण पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने हे मतदान होऊ शकलं नाही. याच मारकडवाडीतील लोकांशी बोलण्यासाठी शरद पवार हे मारकडवाडीत पोहोचले आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमात माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी शरद पवारांसमोर बोलत असताना मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊ का? असा सवाल माळशिरसकरांना केला.
मी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहे की, मारकडवाडीतील 1400 लोकांचे अफेडेव्हिट करणार आहेत. ज्यांनी मला मतदान दिले त्यांचे अफेडेव्हिट कोर्टात देणार आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ठराव आले आहेत. बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा देऊ का?, असा सवाल आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.
माळशिरसच्या पश्चिम भागातून प्रत्येक फेरीला मी मागे पडलो. त्यावेळी आम्ही VV PAT मोजणीची मागणी केली मात्र मतमोजणी सुरु असताना तसे करता येत नाही असे सांगितले. या निकालानंतर लोक 3 दिवस माझ्याडे येत होते. कारण असं मतदान कसं काय झालं हा सवाल होता. त्यामुळे ग्रामस्थांनी ठरवले की आपण बॅलेट पेपरवर मतदान करावे. मात्र प्रशासनाने त्याला नकार दिला. मारकडवाडी गावातील माती मी चैत्यभूमीवर नेली आणि तेथे वाहिली. कारण मारकडवाडी येथील लोक लढाऊ बाण्याचे आहेत, असं उत्तमराव जानकर म्हणालेत.
राहुल गांधी यांनी माणसे पाठवून इथली माती घेऊन गेले. महात्मा गांधी यांच्या चरणावर मारकडवाडीतील माती वाहणार आहेत. मला काल अनेक आमदार म्हणत होते आता विजयी झालात ना, कशाला करता जाऊद्या की. पण लोकशाही टिकली पाहिजे, आमदारकी गेली तर गेली. लोकसभेला भाजपला केवळ 54 हजार मतं आहेत. मग आता 1 लाख हजार मतं कसं मिळाली? यांनी मोदीला माळशिरसच्या बाजारात उतरवले होते. गुरुवारी माळशिरसचा बाजार असतो त्या ठिकाणी मोदींची सभा घेतली तरीही 54 हजार मतं मिळाली. मी राजीनामा देतो. माझी पोटनिवडणूक घ्यावी पण बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी माझी विनंती, असं जानकर म्हणालेत.