रवी लव्हेकर, प्रतिनिधी, सोलापूर : पंढरपुरात आल्यानंतर भाविक विठ्ठलासमोर नतमस्तक होतात. पण, दरवर्षी पंढरपूरचे दर्शन करणे प्रत्येकाला शक्य नसते. अशावेळी येथून मूर्ती खरेदी करून नेल्या जातात. घरी विठ्ठलाची भक्ती केली जाते. त्यामुळे येथील मूर्तांना मोठी मागणी असते. या मूर्ती सध्या तयार केल्या जात आहेत. यासाठी कामगार कामाला लागले आहेत. आषाढी वारीचे सर्वत्र वेध लागले आहेत. पंढरपुरातही मोठ्या प्रमाणावर यात्रेची तयारी सुरू आहे. यामध्ये दगडी मूर्ती तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे. पंढरपुरात घडवलेल्या मूर्ती या महाराष्ट्रासह इतर राज्यातही जातात. या मूर्तांना आषाढी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते. टाकेचे घाव सोसल्याशिवाय दगडाला ही देवपण येत नाही, असे कायमच म्हटले जाते. याच मराठी भाषेतील म्हणीची प्रचिती पंढरपुरातील अनेक दगडी कारखान्यांमध्ये पाहायला मिळते.
छन्नी हातोड्याने घाव घालून दगडाला सुबक आकार देण्याचे काम येथील कारागीर करतात. यासाठी काळा पाषाण, संगमरवर, शाळीग्राम अशा वेगवेगळ्या दगडांचा वापर या कारखान्यांमधून होत असतो. हल्ली दगडाच्या मूर्ती छन्नी हातोड्याचा शिवाय वेगवेगळ्या मशिनरीच्या माध्यमातून देखील घडत आहेत.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील मठ, धर्मशाळा, राहती घरे यांचे सर्वेक्षण नुकतेच पंढरपूर नगरपरिषदेने केले. यामध्ये शहरातील 115 मठ, धर्मशाळा आणि घरांच्या इमारती या धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. या इमारती उतरवून घेण्याचे काम देखील आता नगरपालिका प्रशासन हाती घेत आहे.
काही दुरुस्तीला आलेल्या इमारतींबाबत संबंधित मालमत्ता धारकांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशा धोकादायक मठ, धर्मशाळा आणि इमारतींमध्ये भाविकांनी राहू नये. आपल्या जीविताच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले.
तसेच धोकादायक इमारतींवर संबंधित इमारत धोकादायक आहे. अशा पद्धतीच्या सूचना आणि फलक देखील लावण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.