सोलापूरः सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (Supreme Court order) कुठल्याही धार्मिक स्थळी सकाळी 6 ते 10 पर्यंत भोंग्याना परवानगी दिली आहे. तर पंढरपूरमधील विठ्ठल रूक्मिणी मातेची काकड आरती (Kakad Arati) पहाटे 5 वाजता होते. पहाटे 5 वाजता होणारी काकड आरती ऐकण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात उपस्थित असतात. परंतु आता ही काकडा आरती लाऊडस्पीकरविना होणार असल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त आहे.
भोंग्याच्या विषयावरून सध्या राज्यात सुरु असलेल्या गोंधळाचा फटका आता थेट विठ्ठल मंदिरालादेखील (Vitthal Mandir Pandharpur) बसणार आहे.
मंदिरातून होणारी काकडा आरती आणि धुपारती आता स्पिकरावरून लावता येणार नाही. विठ्ठल मंदिर प्रशासनाने आता पोलिसांकडे स्पिकर वापरण्यासाठी परवानगी घेण्याची तयारी सुरु केली असून सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिरात स्पीकर वापरला जाईल असे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले आहे.
भोंग्याच्या मुद्यावरून भाविकांच्या भावना मात्र अतिशय टोकाच्या असून कोणत्याही परिस्थितीत विठ्ठल मंदिरावरील स्पीकर बंद करू नये अशी भूमिका विठ्ठल भक्त घेत आहेत. तर फक्त आवाजाची अट पालन करण्याची सक्ती करावी मात्र मंदिरावरील भोंगे तसेच ठेवण्याचा आग्रह विठ्ठल भक्तांनी केला आहे .
गेल्या अनेक वर्षांपासून रोज पहाटे काकडा आरतीच्या वेळी आणि सायंकाळी धुपारातीच्यावेळी विठ्ठल मंदिरातील स्पीकरच्या वापर केला जात असतो. आता सर्वोच्य न्यायालयाच्या नियमानुसार सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेतच स्पीकर लावायला परवानगी असल्याने काकडा आरतीच्या वेळी विठ्ठल मंदिरालाही स्पीकर लावता येणार नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
राज ठाकरे यांनी काढलेल्या भोंग्याच्या मुद्याचा सर्वात जास्त फटका हा राज्यातील हिंदू मंदिरे आणि धार्मिक कार्यांना बसला असल्याचे मत भाविकानी व्यक्त केले असून आता या सर्व प्रश्नावर शासन काय भूमिका घेणार याकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.