थर्टी फर्स्टला स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, मध्य रेल्वेच्या या मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

| Updated on: Dec 28, 2024 | 7:50 PM

मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या टर्मिनसवर प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या काळात सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी प्रवाशांनी गाडीच्या वेळापत्रकानुसार आधी स्थानकांवर पोहचावे आणि नवीन नियमांचे पालन करावे ही विनंती मध्य रेल्वेने केली आहे.

थर्टी फर्स्टला स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, मध्य रेल्वेच्या या मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
Follow us on

नवीन वर्षाचे स्वागत  तोंडावर आले असताना मध्य रेल्वेने रेल्वेस्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या प्रमुख टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंद घालण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवर पहाटेची गोरखपूरची ट्रेन पकडताना अपघात होऊन २७ ऑक्टोबर रोजी नऊ जण जखमी झाले होते. या प्रकारानंतर देखील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विक्री थांबविली होती. आता पुन्हा नवीन वर्षाच्या अखेरीस गाड्यांना होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवात करताना अनेक जण फिरायला निघतात, काही जण वर्षांची सुरुवात धार्मिक स्थळापासून करतात, तसेच सलग सुट्ट्या असल्याने सहलीला देखील अनेक जण जात असतात, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मध्य रेल्वेने तात्पुरती बंदी घातली आहे. फलाटावर मेल-एक्सप्रेस पकडताना अनेकदा प्रवास करणारे कमी परंतू त्याला सोडविण्यासाठी आलेल्यांची गर्दी अधिक असते. अशा प्रकारचे अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने महत्वाच्या टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मवरील तिकीट विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

कधी असणार फलाट तिकीट विक्री बंद

मध्य रेल्वेने लांबपल्ल्याच्या टर्मिनसवर प्लॅटफॉर्मवर तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी २९ डिसेंबर २०२४ ते ०२ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे ज्यांना प्रवास करायचा आहे, अशाच प्रवाशांची गर्दी होऊन काऊड मॅनेजमेंट करणे सोपे होईल असे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

खालील १४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

दादर

लोकमान्य टिळक टर्मिनस

ठाणे

कल्याण

पनवेल

पुणे

नागपूर

नाशिक रोड

भुसावळ

अकोला

सोलापूर

कलबुर्गी

लातूर

विशेष सवलत :  या बंदीतून काही जणांना वगळण्यात आले आहे. वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही अशांना हा नियम लागू होणार नाही. त्यांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने या निर्बंधांमधून या घटकांना सूट देण्यात आली आहे.