परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीमृत्यूप्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना काल सकाळी सोमनाथ सूर्यवंशीना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एका माथेफिरूने 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती, आणि त्याविरोधात 11 तारखेला आंदोलन करण्यात आलं होतं.
त्याच आंदोलनादरम्यान दगडफेक तसेच तोडफोड झाली होती. दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती. 14 तारखेला त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. मात्र काल सकाळी (15 डिसेंबर) सोमनाथ सूर्यवंशी यांचा सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर आज आंबेडकरी अनुयायांकडून आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच अनुयायींनी जिल्हा बंद पुकारला आहे. बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील मैदानात आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं ?
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथेच संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी संध्याकाळी एका माथेफिरू इसमाने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. ही घटना समोर येताच शहरातील आंबेडकरी अनुयायी संतापले आणि त्यांनी मंगळवारी संध्याकाळीच रेल्वे रोको तसेच रस्ता रोको केला. तर, दुसऱ्या दिवशी बुधवारी आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावर आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होतं. पण त्यानंतर परभणीत जाळपोळ झाली, दगडफेकही करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं.
त्यामध्येचे सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. 14 तारखेलाच सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली , मात्र काल ( रविवार 15 डिसेंबर) त्यांना न्यायालयीन कोठडीत असतानाचा हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. पण पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होणार असून त्या रिपोर्टची सर्वांना प्रतीक्षा आहे.
मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांवर विविध आरोप केले जात असून आंबेडकरी अनुयायींच्या बैठकीत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार आहे.
पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण व्हावे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी
परभणीत वडार समाजातील भीमसैनिक – सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, हे वेदनादायक असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, पोस्टमॉर्टम तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी अशी विनंती आमचे वकील न्यायालयात करतील की. पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण करण्यात यावे. फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली पोस्टमॉर्टम केले जावे अशी मागणी आंबेडकर यांनी केली.