मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : शिर्डी येथील साई बाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. त्या दरम्यान व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली दर्शन घडवून आणणारी टोळीच शिर्डी संस्थानच्या आवारात कार्यरत असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींचे पीए असल्याचे किंवा एजंट म्हणून वावरणाऱ्यांना शिर्डी संस्थानकडून दणका देण्यात आला आहे. त्यामुळे साईबाबांचे व्हिआयपी दर्शन घडवून देणा-या बोगस पीए आणि एजंटाना बसणार चाप बसणार आहे. आजी – माजी आमदार , खासदार तसेच विश्वस्तांच्या पीएंना मंदिर परिसरात नो एन्ट्री असणार आहे. दररोज व्हिआयपी दर्शन घडवण्यासाठी मोठी लगबग असल्याचे लक्षात आल्यानंतर संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी याबाबत थेट आदेशच काढले आहे.
शिर्डी संस्थानच्या कार्यालयासह मंदिर परिसरात यापुढे आजी माजी मंत्री, आमदार, खासदार आणि विश्वस्तांच्या अधिकृत स्विय सहाय्यकाकडून संस्थानला पत्र द्यावे लागेल तरच व्हीआयपी दर्शनासाठी सेवा मिळणार आहे.
शिर्डी संस्थानच्या काही बाबी लक्षात आल्यानंतर नव्याने रुजू झालेले सीईओ राहुल जाधव यांनी हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे साईभक्तांची लूट थांबणार आहे.
भाविकांची व्हिआयपी दर्शनाच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबणार असून प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचा गैरवापर देखील थांबणार आहे.
व्हिआयपी दर्शन घडवणा-या संस्थान कर्मचा-यांवरही कठोर कारवाई केली जाणार असून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी याबाबत थेट आदेशच काढले आहे.
शिर्डी संस्थानकडून दर्शनसाठी व्हीआयपी सेवा आहे, त्याच्या नावावर आर्थिक लूट करणारी टोळीच संस्थानच्या आवारात फिरत असल्याच्या तक्रारी आणि काही बाबी निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.