जालना : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतलाय. 10 वी आणि 12 वी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलाय. 10 वीची परीक्षा आता जूनमध्ये तर 12 वीची परीक्षा मे च्या शेवटी घेण्यात येणार आहे. या निर्णयाचं स्वागत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचं मी स्वागतच करेल असं टोपे यांनी म्हटलंय. (Rajesh Tope welcomes the decision to postpone the exam)
जान है तो जहान है किंवा सर सलामत तो पगडी पचास. परीक्षा आज नाही तर उद्या होतील किंवा सगळ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय होऊ शकतो, त्याबाबत मी आग्रह केला होता, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचे मी स्वागत करतो, असं राजेश टोपे म्हणाले. सध्या तरुण वर्गात कोरोना संक्रमणाचं प्रमाण अधिक आहे. 10 ते 20 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मी सुद्धा आग्रह केला होता. अशावेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असेल तर मी त्याचं स्वागत करतो, असं टोपे म्हणाले.
बैठकीत ऑक्सिजन संदर्भात चर्चा झाली. ऑक्सिजन संदर्भात काय पर्याय आहेत? कारण 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन आता 100 टक्के फक्त वैद्यकीय गरजेसाठी वापरतो आहोत. या ऑक्सिजनचं दररोज उत्पादन झालंच पाहिजे. ऑक्सिजनच्या उत्पादनाच्या कामात योग्यपणे व्यवस्थापन झालं पाहिजे. त्यानंतर ऑक्सिजन प्रत्येक जिल्ह्याला कोठ्यानुसार दिला गेला पाहिजे. तिथं गेल्यानंतरही जे रिफलिंग केला जातो, त्यावेळी देखील त्याठिकाणी एफडीएचे अधिकारी आणि कलेक्टर तिथे असले पाहिजे. कारण रिफिलिंग सेंटर येथून इन्डस्ट्रीज सुद्धा घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे हा ऑक्सिजन मेडिकलला कमी पडू शकतो. त्यामुळे मॉनिटेरिंग झालं पाहिजे. यासाठी एफडीएला जबाबदार धरलं आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिलीय.
तसंच राज्यात अनेक ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट किंवा टँक उपलब्ध नाहीत. राज्यात सर्व रुग्णालयात असे टँक निर्माण झाले पाहिजेत. यासाठी डीपीडीसीतून पैसे खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. सध्या असलेले लिक्विड ऑक्सिजन प्लांट पुरत नाहीत. त्यामुळे हवेतला ऑक्सिजन घेऊन प्युरिफिकेशन करुन पुरवठा करतो, छोट्या मशीनमधून हा ऑक्सिजन घेता येतो, असंही टोपे म्हणालेत.
लॉकडाऊन कधी लागेल हे सांगता येत नाही. काही महत्वाचे दिवस आहेत. 14 एप्रिल संपू द्यावं लागेल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिलीय. लॉकडाऊनच्या काळात गरीब घटकाला कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबतही चर्चा सुरु असल्याचं टोपे म्हणाले. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्याबाबत चर्चा सुरु आहे, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही टोपेंनी सांगितलं.
त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ऑस्किजन बेड वाढवा अशा सूचना केल्या आहेत. तसंच डॉक्टर, नर्सेसची संख्या वाढवा असे आदेश दिले आहेत. त्यासाठीही पैसेही देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, उस्मानाबादसारखी घटना ही निष्काळजीपणाच असल्याचं टोपे म्हणालेत. राज्यात सध्या रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत आहे. अशावेळी 15 दिवसांत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचं उत्पादन दुप्पट होणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
संबंधित बातम्या :
Rajesh Tope welcomes the decision to postpone the exam