मुंबई | 24 जानेवारी 2024 : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी या विधानसभा मतदारसंघात एक मोठी घटना घडली आहे. वरळी स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात स्टॅपपेपर असलेली शासकीय कागदपत्रे जाळण्यात आली आहेत. सुमारे 50 हून अधिक गोण्या भरून ही कागदपत्रे येथे आणण्यात आली होती. 31 तारखेपासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती येथील प्रत्यक्षदर्शनी दिली. मात्र, ही कागदपत्रे नेमकी कुठली आहेत. ती कोणती कागदपत्रे आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे जाळलेल्या या शासकीय कागदपत्रांचे गौडबंगाल काय? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.
रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. वरळी स्मशानभूमीमध्ये एक खड्डा काह्णून त्यामध्ये ही कागदपत्रे जाळण्यात येत होती. या कागदपत्रांची धूळ जास्त प्रमाणात उडत असल्याने नागरिकांनी स्मशानभूमीत धाव घेतली त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला.
एक अज्ञात व्यक्ती हे कागदपत्रे जळत होती. मात्र, नागरिकांना पहातच ती व्यक्ती पसार झाली. एका छोट्या टेम्पोमधून सुमारे 50 हून अधिक गोण्या भरून आणल्या होत्या. त्या स्मशानभूमीमध्येच पसरवून ठेवण्यात आल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच वरळी स्मशानभूमीत एकच गर्दी झाली.
गोण्यामध्ये असलेल्या या स्टॅपपेपरची कटिंग मशीनमध्ये तुकडे करण्यात आले आहेत. या स्टॅपपेपर शासकीय सील आहे. तसेच त्यावर तारीखही आहे. त्यामुळे ही नेमकी कुठली कागदपत्रे आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस स्टेशनचे पोलीस येथे दाखल झाले.
वरळी पोलिसांनी ही कागदपत्रे कुणाची आहेत. ती का अन्न्ण्यात अली यादृष्टीने तपास सुरु केला आहे. येथील नागरिकानी अधिक माहिती देताना सांगितले की, यापूर्वीही असे प्रकार घडले होते. मात्र, त्यावेळी कमी प्रमाणात कागदपत्रे जाळण्यात आली होती. पण, आता कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणात धूर झाला. धूळ उडू लागली. त्यामुळे नेमका प्रकार काय हे पाहण्यासाठी गेलो असता ते शासकीय स्टॅपपेपर असल्याचे दिसले.
कागदपत्रे जाळणारा व्यक्ती पळून गेला. पण, येथे एक अधिकारी आणि त्यांच्यासोबत दोन पोलीस होते. त्यांनी ही कागदपत्रे फोर्टमधून आणल्याचे सांगितले. परंतु, अशी कोणतीही शासकीय कागदपत्रे जाळता येत नाहीत. जर जाळायची असतील तर त्यांनी ती दिवसा जाळायला हवी होती. ही मंत्रालय येथील कागदपत्रे आहेत का? याची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
ही कागदपत्रे मराठा आरक्षणाची आहेत का? की उद्धव ठाकरे यांची कागदपत्रे आहेत का? अशी शंकाही काहींनी उपस्थित केली. तसेच ते दोन पोलीस कुठले होते. त्याचू माहिती वरळी पोलिसांना नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद आहे असा आरोप नागरिकांनी केलाय.