Cabinet expansion : ज्याला प्रचाराच्या पहिल्याच सभेत एकनाथ शिंदेंनी दिला मंत्रिपदाचा शब्द, त्याच नेत्याचा केला पत्ता कट, नेमकं काय घडलं?

| Updated on: Dec 16, 2024 | 2:50 PM

रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र अनेक इच्छुकांची वर्णी नव्या मंत्रिमंडळात लागू शकली नाही, त्यामुळे अनेक जण नाराज असल्याचं चित्र आहे.

Cabinet expansion : ज्याला  प्रचाराच्या पहिल्याच सभेत एकनाथ शिंदेंनी दिला मंत्रिपदाचा शब्द, त्याच नेत्याचा केला पत्ता कट, नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळू शकली नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली.

यामध्ये भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. शिवसेना शिंदे गटाच्या 11 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात नागपूरमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छूक होते, आपल्यालाही मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. पंरतु त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता या नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. एकनाथ शिंदे गटाकडून यावेळी तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर या बड्या नेत्यांना यावेळी मंत्रिपद देण्यात आलं नाही.

दरम्यान तानाजी सावंत यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतली होती. या प्रचार सभेत तानाजी सावंत यांना शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता. तानाजी सावंत यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं. ‘तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी’ असं एकनाथ शिंदे यांनी भरसभेत म्हटलं होतं. मात्र आता तानाजी सावंत यांचं मंत्रिपद हुकलं आहे. मंत्रिपद मिळालं नसल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची बातमी समोर येत आहे.

शिवसेनेत कोणाचा पत्ता कट 

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिवसेनेकडून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि विजय शिवतारे यांचा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाहीये.  त्यामुळे आता शिवेसना शिंदे गटात नाराजी असल्याचं समोर येत आहे.