नाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थित कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार होता. यावेळी या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवार यांच्या सोबत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, माजी मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचेही नाव होते. मात्र, यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबरच पालकमंत्री दादा भुसे, आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांचा दौरा हा हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते येऊ शकले नाही अशी समोर येत असली तरी त्यामागे काही राजकीय कारण आहे का अशी उलट सुलट चर्चा नाशिकच्या राजकारणात होऊ लागली आहे.
कर्मवीर काकासाहेब वाघ हा साखर कारखाना सुरू करण्यामध्ये आमदार दिलीप बनकर यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्याच संस्थेच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यात आला आहे.
यावेळी हा कारखाना सुरू करत असतांना माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बनकर यांना मोठी मदत केली होती.
मात्र, कारखाना सुरू झाल्यानंतर उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहिले होते.
अजित पवार यांनी शरद पवारांना याबाबत जास्त माहिती आहे त्यांना निमंत्रित करा असे आमदार दिलीप बनकर यांना सांगितले होते.
दरम्यान, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी दिलीप बनकर यांना निवडून द्या, मी निफाड कारखाना सुरू करून देतो असं आश्वासन दिले होते.
निफाड तालुक्यातील दोन्हीही साखर कारखाने बंद होते. त्यात रानवड येथील साखर कारखाना दिलीप बनकर यांच्या पुढाकाराने सुरू झाला असून आज 40 वा गळीत हंगामाचा शुभारंभ पार पडला आहे.
मात्र, या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित न राहिल्याने विविध चर्चा होऊ लागल्या असून त्यात निफाड कारखाना सुरू करण्याबाबत दिलेले वचन पूर्ण करता न आल्याने पवारांनी दौरा रद्द तर केला नाही ना ? असा एक सुरू बघायला मिळत आहे.
दरम्यान, अजित पवार हे या कार्यक्रमाला येणार होते, परंतु हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते येऊ शकले नाही अशी माहिती दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर यांनी दिली आहे.