काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी सुजय विखे यांच्या जाहीर सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. यानंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. वसंतराव थोरात यांच्या आक्षेपार्ह विधानाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. अहिल्यानगर पोलिसांना पत्र लिहून कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या विधानाचा मी जाहीर निषेध करते. अहिल्यानगरच्या पोलिसांना पत्र लिहित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिलांबाबत कुणी अशी विधानं करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाहीत, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.
भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणालेत.
जयश्री थोरात यांनी माध्यमांशी बोलताना जयश्री थोरात यांनी सवाल केला आहे. मी असं काय केलं होतं की, माझ्याबद्दल असं बोलावं? हे विधान त्यांच्या वयाला शोभणारं नाही, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर थोरातांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सुजय विखेंच्या समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड केली. तसंच संगमनेरच्या पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. जयश्री थोरात आणि बाळासाहेब थोरात यांची बहीण दुर्गा तांबे या रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर होत्या. त्यांनंतर पहाटे वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल झाला.