नाशिकः कृषिपंप वीजग्राहक शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महा कृषी ऊर्जा अभियानात थकीत वीजबिलातून वसूल झालेल्या 66 टक्के कृषी आकस्मिक निधीचा वापर करत जळगाव परिमंडलात 5819 शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. वीजबिलांच्या वसुलीतून एकूण 66 टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी 33 टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर खर्च करण्यात येत आहे.
सव्वाशे कोटीच्या वर वसुली
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या महा कृषी ऊर्जा अभियानात जळगाव परिमंडलात आजपर्यंत कृषिपंपांची 126 कोटी 37 लाख रुपयांची वीजबिले भरून शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. एक गाव एक दिवस, ग्राहक मेळावे, बैठका अशा विविध उपक्रमाद्वारे कृषिपंपधारक शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीमुक्त अभियानात सहभागी करून घेण्यात आले आहे. महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे.
तर 1761 कोटी 65 लाख रुपयेही माफ
या योजनेत जळगाव परिमंडलातील3 लाख 64 हजार 152 शेतकऱ्यांकडे एकूण 5422 कोटी 54 लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणकडून निर्लेखन व वीजबिल दुरुस्ती समायोजन करून शेतकऱ्यांकडे 3523.30 कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च 2022 पर्यंत त्यातील 50 टक्के म्हणजे 1761 कोटी 65 लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित 1761 कोटी 65 लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत. महा कृषी ऊर्जा अभियानात सहभागी झालेल्या जळगाव परिमंडलातील 1 लाख 13 हजार 749 शेतकऱ्यांना 504 कोटी 30 लाख रुपयांची सूट मिळालेली आहे.
33 टक्के रक्कम आकस्मिक निधी
जमा झालेल्या वीजबिलातून 33 टक्के रक्कम ग्रामपंचायतीअंतर्गत व 33 टक्के रक्कम ही जिल्हांतर्गत कृषी आकस्मिक निधी म्हणून वापरली जात आहे. या निधीतून नवीन वीजजोडण्या देण्यासोबतच विजेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्याची कामे केली जात आहेत. या निधीद्वारे जळगाव जिल्ह्यातील 3440, धुळे जिल्ह्यातील 1551 तर नंदुरबार जिल्ह्यातील 828 शेतकऱ्यांना वीजजोडणी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी महा कृषी ऊर्जा अभियान ही थकबाकीमुक्तीची सुवर्णसंधी आहे. या योजनेत कृषिपंपधारकांनी सहभागी होत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील विद्युत यंत्रणेचा विकास साधावा. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप थकबाकी भरली नाही त्यांनी पुढे येऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव परिमंडलाच्या वतीने करण्यात येत आहे.
इतर बातम्याः