गोंदिया : 27 सप्टेंबर 2023, शाहिद पठाण | गोंदियात राहणारी कमला हिची तब्येत बिघडली होती. उपचारासाठी ती सुरतला गेली. तेथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर ती पुन्हा गोंदियाला परत आली. पण, तिची तब्येत काही सुधारत नव्हती. तिच्या मनात काही तरी विचार घोळत होता. अखेर तिने आपल्या पतीला ती गोष्ट सांगितली. हातातले पैसे संपत आले होते. असं लपूनछपून जगणं त्यांना आता नकोसं झालं होतं. त्यालाही तो निर्णय पटला. गोंदिया जिल्हा पोलिसांच्या ते संपर्कात आले. पोलिसांनी त्यांना 11 लाख रुपये दिले. कोण आहेत कमला आणि तिचा पती लच्छन?
देशात माओवादी चळवळीने डोके वर काढले आहे. माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा. अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करावे. त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी राज्यसरकारने एक योजना आणलीय. नक्षल आत्मसमर्पित योजना हे त्या योजनेचे नाव. या योजनेच्या अनुषंगाने गोंदिया पोलीस दलाकडून माओवाद्यांच्या विलय सप्ताहाचे आयोजन करण्यात आलंय.
लच्छु ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी आणि त्याची पत्नी कमला दोघेही नक्षल चळवळीशी जोडले गले होते. लच्छु उर्फ लच्छन हा 1999 साली माओवादी संघटनेत भरती झाला. अबुझमाड येथे त्याने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गोंदिया देवरी दलममध्ये उपकमांडर म्हणून तो काम करत होता. चकमक आणि जाळपोळीचे 6 गुन्हे त्याच्यावर दाखल होते. ही कामगिरी पाहून त्याला कमांडर पद दिले. तर, पोलिसांनी त्याला पकडून देणाऱ्यास 16 लाखांचे इनाम जाहीर केल होते.
लच्छनची बायको कमला ऊर्फ गौरी ही सुद्धा तशीच खतरनाक नक्षलवादी. 2001मध्ये नक्षलवादी चळवळीत भरती झाली. बालाघाटच्या जंगलात तिला प्रशिक्षण दिले गेले. कोरची, खोब्रामेंढा, चारभट्टी दलम, प्लाटून- ए येते काम केल्यानंतर तिला गोंदियात पाठवण्यात आलं. मारहाण, पोलिसांवर फायरिंग, जाळपोळ असे 8 गुन्हे तिच्यावर दाखल आहेत. तिच्यावरही पोलिसांनी 3 लाखांचे बक्षीस लावले होते.
कमला हिची तब्येत बरी नसल्याने त्यांनी ती सुरत गाठले. पण, प्रकृती बरी होत नसल्याने तिने दलम सोडण्याचा विचार केला. ज्यांच्यासाठी काम करत होते त्यांनी काहीच मदत केली नाही. तिने पतीला समजावले आणि त्या दोघांनी दलम सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना पुन्हा त्या वाटेवर जायचे नव्हते. अखेर, त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला.
लच्छन आणि कमला यांनी गोंदिया जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला. अखेर, माओवाद्यांच्या विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले. ज्या जोडप्यावर पोलिसांनी एकूण 19 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तेच दोघे स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले होते.
महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत पदनिहाय जाहिर बक्षीस 3 लाख, केंद्र शासनाच्या एस.आर.ई. योजनेअंतर्गत 2.50 लाख असे 5 लाख 50 हजार रुपये लच्छनला मिळाले. तर, कमला उर्फ गौरीला 4 लाख 50 हजार रुपये मिळाले. दोन्ही पती-पत्नी यांनी एकत्रित आत्मसमर्पण केले त्यामुळे त्यांना अतिरिक्त 1 लाख 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्यासमोर या जोडप्याने आत्मसमर्पण केले.