मुंबई : गेल्या काही काळात ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray) अनेक आरोप झाले आहेत. हे सरकार वसुली सरकार आहे, असेही आरोप भाजप सतत करत आल्याचे दिसून आले. त्यात फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुंबई महापालिकेत कोविड कळात कसा भ्रष्टाचार झाला, याचा पाढाही आपल्या विधानसभेतल्या भाषणात वाचून दाखवला. तसेच खासकरून अनिल देशमुखांचं नाव सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात समोर आल्यानंतर आणि त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केल्यानंतर या आरोपांना आणखी हवा मिळाली. त्यात अधिकाऱ्यांचं बदल्यांचीही प्रकरणेही चांगलीच गाजली. मात्र अशातच अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून भाजप खासदार सुजय विखे यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. याचंं सरकार होतं तेव्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मोठा पैसा लाटण्यात आला, असे सुजय विखे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी 50 50 लाख घेतले गेले, असा थेट आरोप विखेंनी केलाय. तर तो अधिकारी सर्वसामान्य जनतेकडूनच दिलेला पैसा वसूल करणार आहे. त्यामुळेच ब्युरोक्रसीन केलेल्या वसुलीमुळे महागाई वाढली, असे म्हणत महागाईचं खापरही विखेंनी आता महाविकास आघाडीवरच फोडलं आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश होता की शिवसेना कशी संपवता येईल, पण मला आज आनंद की 40 आमदारांनी ती जाण ठेवत ते आमच्या सोबत आले. मी भाजपमध्ये आल्यानंतरही माझ्या प्रत्येक फ्लेक्सवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कायम ठेवला, ही माझी वैचारिकता आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आमदारांनी बंडखोरी केल्यापासून सतत त्यांच्यावर गद्दार म्हणून आदित्य ठाकरे टीका करत आहेत. त्यालाच सुजय विखेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. तर आमदारांनीही आता आदित्य ठाकरेंवर सडकून टीका करत त्यांना थेट आव्हान द्यायला सुरू केलंय. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
तसेच अडीच वर्षे आम्ही भाकीत करत होतो, सरकार पडेल आता ते करत आहेत, ज्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मंत मागितली आणि अचानक विधानसभा निवडणुकीनंतर फोटोतील व्यक्ती नकोसा झाला, त्यांनी निष्ठेची गोष्ट करावी हे हास्यास्पद आहे, अशी घणाघाती टीका सुजय विखेंनी ठाकरेंवर केली आहे. तसेच पंतप्रधानांच्या फोटो शिवाय निवडणूक लढवून दाखवा असे थेट आव्हान सुजय विखे यांनी दिलं आहे.