NCP Hearing : सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना मोठा इशारा, ‘कोर्टाच्या निर्देशाचे पालन करा, नाहीतर….’

| Updated on: Oct 24, 2024 | 4:32 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष, चिन्हाबाबत 6 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. घड्याळ हे चिन्ह दोन्ही पक्षांना वापरायला मिळू नये, अशी मागणी शरद पवार गटाची याचिकेतून करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला.

NCP Hearing : सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना मोठा इशारा, कोर्टाच्या निर्देशाचे पालन करा, नाहीतर....
सुप्रीम कोर्टाचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना मोठा इशारा
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा कालावधी सुरु झालाय. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज तिसरा दिवस आहे. राज्यभरात अनेक दिग्गज नेत्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रत्येक उमेदवाराकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा-कळवा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षप्रमुख शरद पवार हे स्वत: उपस्थित होते. एकीकडे राज्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात आज अतिशय महत्त्वाच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी पार पडली.

सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीवेळी शरद पवार गटाने जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर अजित पवार गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. यानंतर सुप्रीम कोर्टाने दोन्ही गटांना महत्त्वाचा इशारा दिला. यावेळी शरद पवार गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कोर्टाने अजित पवार गटाला सगळीकडे घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर लावायला सांगितले होते. ते डिस्क्लेमर आधी न लावता आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणावर लावण्यात आले, असा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. त्यावर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निर्देश दिले की, 6 नोव्हेंबरपर्यंच प्रतिज्ञापत्र दाखल करा. तसेच याबाबत अजित पवार गटाला नोटीसही देण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा

सुप्रीम कोर्टाने यावेळी शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघांना इशारा दिला. दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करायचे आहे. नाहीतर आम्ही अवमानाचा ठपका ठेवू. तुम्ही दोघांनीही तुम्हाला दिलेले निर्देश पाळले पाहिजेत. जर मुद्दाम निर्देशांचे उल्लंघन कोणी केलं तर आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू. आम्ही स्वतःहून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू, असं आश्वासन अजित पवारांनी कोर्टात दिलं.