विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं काउंटडाउन सुरू झालं आहे. येत्या वीस तारखेला बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अकोले येथे झालेल्या प्रचार सभेत मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तुतारीच्या आदर्श नेतृत्वाने शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावे? 78 पासून त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे. पण त्यांनी केलं तर गद्दारी नाही, असा घणाघात मुंडे यांनी केला आहे, तसेच समोरा समोर बसायचे असेल तर धनंजय मुंडेंची तयारी आहे. 2017 पासून दिल्लीत काय झालं ते दादांचा शपथविधी ते महाविकास आघाडीचे सरकार येण्यापर्यंत काय झालं हे पुराव्यानिशी सिद्ध करेल, असं थेट आव्हानाच मुंडे यांनी शरद पवार यांना दिलं होतं.
दरम्यान आता सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचं हे चॅलेज स्वीकारलं आहे. धनंजय मुंडे हे राज्यातील मोठे नेते आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो, ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती वेळ आणि म्हणतील ते कॅमेरे. चर्चेला बसायची माझी तयारी आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या श्रीरामपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
नेमकं काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे यांनी अकोले येथे बोलताना शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला होता. तुतारीच्या आदर्श नेतृत्वाने शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावे? 78 पासून त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली होती, त्याला आता सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.