अमरावती : 3 ऑक्टोबर 2023 | सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत. पण, गोरगरीब सामान्य लोकांच्या औषधासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. 50 खोके. एकदम ओके सरकारला औषध घ्यायला पैसे नाही. 21 व्या शतकात औषधे कमी कशा पडतात? ईडी, सीबीआयमधून थोडा वेळ काढून देवेंद्र फडणवीस यांनी जरा राज्यात लक्ष द्यावे. मुंबईत मराठी महिलांना घर मिळत नाही हे सरकार काय करत आहे? भाजप महाराष्ट्रात वेगळं आणि दिल्लीत वेगळं बोलतात अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. तर, राज्यातील तीन पक्षाच्या सरकारवरही त्यांनी बोचरी टीका केलीय.
सुप्रिया सुळे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती येथे पदाधिकारी मेळाव्यात बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. अमरावती हे संस्कृत शहर आहे. अमरावतीमधील संत्रा निर्यात होत होता त्यात मोठी घट झाली. मनपाने शहरात टॅक्स वाढवला पण त्याला उपमुख्यमंत्री यांनी स्टे दिला. तरीही लोकांना वाढीव टॅक्स येत आहे हे कसं? असा सवाल त्यांनी केला.
येत्या 15 दिवसांत शरद पवार भाजपसोबत दिसतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता केवळ चार दिवसच झाले आहेत. आणखी 11 दिवस वेळ आहे. अमरावती लोकसभा, मेळघाट विधानसभा, दर्यापूर विधानसभा आणि बडनेरा विधानसभा जागा लढवण्यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. मात्र, कोणीही किती दावे केले तरी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर महाविकास आघाडी निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आमच्या पक्षातील एक छोटा घटक तिकडे गेला आहे. निवडणूक आयोदास्मोर सुनावणी त्या घटकांनी मागितली आहे. घरातील मूल. नातवंड कशीही वागली तरी ज्येष्ठांना त्यांना सांभाळावे लागते. परीक्षा सुरू व्हायच्या आधीच पेपर फुटला. या तारीखेला पक्ष चिन्ह मिळेल हे यांना कसं माहित आहे. पक्षाचे उभारणीचे आव्हान आम्हाला वाटत नाही. पण सरकार अंधाधुंदपणे काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
मी लोकसभेत बोलली की माझ्या नवऱ्याला नोटीस येते. मी त्याला आता नोटीस नाही तर लव लेटर म्हणते. ते म्हणतात पक्ष आणि चिन्ह आमचं आहे. अरे एकदा घेऊन तर बघा. मला हे कळत नाही हे त्यांना कसं कळतं. चार पक्ष फिरून आलेले लोक आम्हाला सांगणार का? पक्ष आमचा, चिन्ह आमचा नेऊन तर बघा. महाराष्ट्रातल्या लेकी दिल्लीसमोर झुकणार नाही असे आव्हान त्यांनी अजितदादा गटाला दिले.
तीन इंजिनचे सरकार इंडियाला घाबरते. चालायला देखील राज्यात मनाई आहे का? सत्य परेशान हो सकता लेकींन पराजीत नही हो सकता’. राज्यात ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्यावरून राज्यात शासन आहे असे वाटत नाही. तीन महिन्यापासून सरकारचे काम बंद आहे. तीन इंजिनमधील एक घटक फडणवीस यांना भेटायला गेला. तीन महिन्यात तुमचं हनिमून संपायच्या आत नाराजी सुरू झाली असा जळजळीत टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.