दिल्ली : पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे निवदेन देत सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली आहे. (Supriya Sule Demand to start Pune and Baramati Memu train Piyush Goyal)
सुप्रिया सुळेंसह खासदार सुनील तटकरे आणि फौजिया खान यांनी गोयल यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी होऊ शकेल. पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली असून या मार्गाचे विद्युतीकरण देखील पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘मेमू’ लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी सुळे यांनी केली.
दौंड स्थानकावरुन बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-मुंबई प्रगती (12126/ 12125) एक्स्प्रेसला दौंडपर्यंत प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणीही सुळे यांनी केली.
तसेच पुणे – सिकंदराबाद, चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस, हमसफर, संपर्क क्रांती या गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. नीरा, पुरंदर येथील मुस्लिम बांधवांना प्रार्थना स्थळापर्यंत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावा लागतो. याठिकाणी रेल्वे रुळाचे काम करण्यात येणार आहे. यासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचे काम करावे अशी सूचना केली.
नीरा स्थानकावर हजरत निजामुद्दीन-गोवा या गाडीला थांबा देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी केली. जेजुरी स्थानकाचे विस्तारीकरण सुरु असताना प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीची इमारत पाडण्यात आली होती. ही शाळा व अंगणवाडीसाठी रेल्वेने पर्यायी जागा उपलब्ध करावी. जेजुरी-नीरा मार्गावरील सुकलवाडी, रेल्वे गेट क्रमांक 25 येथे भुयारी मार्ग बांधावा, अशी मागणीही यावेळी केली.
रोजच्या रोज दौंडहून पुणे आणि पुण्याहून पुन्हा दौंड असा रेल्वे प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यात कामगार, पोलीस, शेतकरी, छोटे व्यावसायिक, विद्यार्थ्यांसह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश होतो. सहजपूरपासून उरुळी कांचन रेल्वे स्टेशन साधारण आठ ते दहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. ते अंतर प्रवाशांसाठी सोयीचे असल्याने सहजपूर आणि कासुर्डी येथे रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या. (Supriya Sule Demand to start Pune and Baramati Memu train Piyush Goyal)
संबंधित बातम्या :
कृषी योजनांसाठी पहिल्यांदाच ऑनलाईन सोडत, 2 लाख शेतकऱ्यांची निवड : दादा भुसे