विनय जगताप, पुणे | 22 नोव्हेंबर 2023 : मराठी लोकांच्या अस्मितेचा फज्जा उडविण्याचे पाप दिल्लीतली अदृश्य शक्ती करत आहे. त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे आहे. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान कसे होईल याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांनाही तसेच वागवले जाते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत पुढील सुनावणी 24 तारखेला आहे. त्यानंतर त्याची तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल असेही त्या म्हणाल्या.
भोर तालुक्यामध्ये सर्व सुविधा आणण्यास आम्हाला यश आलं. मविआच्या काळात ज्या गोष्टींची कमतरता होती ती पूर्ण करण्यास यश आलं. पण, भोर उपजिल्हा रुग्णालयात टेक्निशियनं मिळतं नाही हे अपयश आम्हाला सातत्याने दिसत आहे. गेले अनेक महिने आम्ही याचा पाठपुरावा सरकारकडे करत आहोत. तीन महिन्यांपूर्वी सरकारने शब्द दिला होता की इथे भरती होईल. मात्र, तीन महिने उलटूनही आरोग्य विभागाची भरती झालेली नाही. आज सुविधा आहेत पण त्याला चालवणारा माणूस नाही, अशी टीकाही सुळे यांनी यावेळी केली.
ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे. यांची आपापसातली भांडण संपतील तेव्हा ते राज्यासाठी काही तरी करतील. त्यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणि त्याच्यातून होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात ते व्यस्त आहेत. इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की कॅबिनेटमध्ये वैयक्तिक भांडण झाली. हे महाराष्टाचं दुर्दैव आहे. यामध्ये महाराष्टातील सर्व सामान्य माणूस भरडला जातोय. महाराष्ट्रच्या दुष्काळाबाबत सरकारला पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली.
सत्तेसाठी ट्रिपल इंजिनचं सरकार एकत्र आले आहे. महाराष्ट्रमध्ये यांच्यात भांडण झाली की जे स्वतःला स्वाभिमानी म्हणणारे आहेत त्यांना सातत्याने दिल्ली दरबारी जावं लागतयं असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे पाप हे ट्रिपल इंजिनचं सरकार करतंय. 200 आमदार आहेत त्यांच्याकडे मग इथून काही तरी निर्णय घेऊन दिल्लीला का पाठवत नाहीत असा सवाल त्यांनी केला.
आमदार निलेश लंके यांनी पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर बोलतान त्या म्हणाल्या, पवार कुटुंब हे एकचं आहे. आमची लढाई ही वैचारिक आहे, वैयक्तिक नाही. सातत्याने मी माझी भूमिका यासंदर्भात स्पष्ट केली आहे. त्यामुळं वैचारिक भूमिकेबाबत कसं कॉम्प्रमाईज करणार, असा खरमरीत सवाल त्यांनी केला. आम्ही पाटावर जेवायला बसलो की आमचं ताट हिसकावून घेण्याचे काम केंद्र सरकार आणि अदृश्य शक्ती करत राहणार. मराठी लोकांच्या दीड ते दोन लाख नोकऱ्या दुसऱ्या राज्यात का गेल्या? राज्यातले मराठी पक्ष आहेत तेच कसे काय फुटतात? अशी टीकाही त्यांनी केली.