मोठी बातमी समोर येत आहे, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. सैफवर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली, सैफवर हल्ला करणारा व्यक्ती त्याच्याच घरात रात्रभर दबा धरून बसला होता, त्यानंतर त्याचा तेथील एका महिला कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. हा आवाज ऐकूण सैफ त्याच्या रूममधून बाहेर आला, तेव्हा या व्यक्तीनं सैफवर हल्ला केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. सैफवर हल्ला झाल्यानंतर आता सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
महाराष्ट्र राज्यासाठी ही धक्कादायक बाब आहे, माझं मुंबई पोलिसांशी बोलणं झालं आहे. खान फॅमिली प्रचंड घाबरलेली आहे. मुंबईमध्ये मोकळ्या वातावरणात जगण्याची सवय असल्याने पोलीस सिक्युरेटी नसते. घटनेची गांभीर्यानं दखल घेतल्याचं पोलीस कमिशनर यांनी सांगितलं आहे. याबाबत चैकशी सुरू आहे. बीड आणि परभणी येथील कुटुंबाला जशी पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे, तशीच गरज आता सैफ अली खानच्या कुटुंबाला आहे. खान कुटुंब प्रचंड हादरून गेलं आहे, महाराष्ट्र राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. सध्या आशा घटनेमुळे लोक विचलित झाले आहेत. सैफ अली खानवर झालेला हल्ला हा राजकीय विषय नाही, सध्या राज्यात घडत असलेल्या बाबी चिंताजनक आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हल्ला नेमका कसा झाला?
रात्री दोनच्या सुमारास हा हल्ला झाला आहे, सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यासोबत आधी वाद घातला. आवाज ऐकून जसा सैफ अली खान रूमच्या बाहेर आला, तेव्हा त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत सैफ अली खान गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.