धारावीतील तणावावरून विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र, गृहमंत्र्यांकडे काय केली मागणी ?

| Updated on: Sep 21, 2024 | 12:24 PM

मुंबईतील धारावी येथे तणावपूर्ण परिस्थिती आहे. या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान विरोधकांनी या मुद्यावरून सरकारवर टीका केली असून गृहमंत्र्यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालावे अशी मागणी केली आहे

धारावीतील तणावावरून विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र, गृहमंत्र्यांकडे काय केली मागणी ?
Follow us on

मुंबईतील धारावी येथे तणावपूर्ण परिस्थिती आहे. धारावीतील एका मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरू वाद सुरू झाला. हा भाग तोडण्यासाठी , कारवाईसाठी बीएमसी पथक तिथे गेलं, मात्र स्थानिकांनी त्या पथकाला रोखलं. ही कारवाई रोखण्यासाठी जमावाने विरोध केला, तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. गेल्या अनेक तासांपासून धारावीमध्ये तणावाचं वातावरण असून धारावी पोलीस ठाण्याबाहेरही जमावाने घेराव घालत न्याय देण्याची मागणी केली आहे.

या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान विरोधकांनी या मुद्यावरून सरकारवर टीका केली असून गृहमंत्र्यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी या मुद्यावरून सरकारला सुनावलं.

भाजप सत्तेत आल्यावर वाचाळवीर तयार होतात

संपूर्ण महाराष्ट्रात सारख्या गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. रोज हिट अँड रन, ड्र्ग्स, कोयता गँगच्या बातम्या चॅनेल्सवर दिसतात. आणि आता धारावीत तणावपूर्ण वातावरण… हे सातत्याने का होतंय ? भाजप, त्यांचे सहकारी, पदाधिकारी , मित्र पक्ष विधान करत आहेत. भाजप सत्तेवर असल्यावरच वाचाळवीर या राज्यात कसे येतात ? याचाही अभ्यास केला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

भाजपचे नेते ज्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात बोलतात, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी भाषणं करतात,गृहमंत्री त्या विधानांना डिफेंड करतात, त्यावरून काय बोलणार ? हे दुर्दैवी आहे, असेही त्या म्हणाल्या.

गृहमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालावे

धारावीतील तणावासंबंधी शिवसेना ( उबाठा गट) खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी गृहमंत्र्यांनी त्वरित लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. धारावीतील सर्व पक्षीय प्रमुख लोक आयुक्तांना भेटले आहेत. नेत्यांना भेटले आहेत. यातून शांतपणे मार्ग काढावा लागेल, असं राऊत म्हणाले.

तर सत्ताधाऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्या प्रकारची माहिती घेतली पाहिजे . जर अनधिकृत बांधकाम असेल तर प्रशासन निर्णय घेईल,असे मंत्री उदय सामंत यांनी नमूद केलं.

त्यांना शरिया कायदा लागू करायचा आहे – नितेश राणेंचे टीकास्त्र

धारावीतील तणावपूर्ण परिस्थितीवरून भाजप नेते नितेश राणे यांनी चांगलंच सुनावलंय.या जिहादी मानसिकतेच्या लोकांना देशात, महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचा आहे. कायद्यानुसार अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर महापालिका जेव्हा अतिक्रमण तोडायला आली तेव्हा तिथल्या जिहादींनी अतिक्रमण तोडायला दिलं नाही. उलट मुंबई महापालिकेची वाहने फोडली. ही अरेरावी आणि दादागिरी आहे, त्यांनी पाकिस्तानात आणि बांगलादेशात जाऊन दाखवावी, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं. हा देश संविधानाप्रमाणेच चालणार आहे. या लोकांना जागेवर आणण्याचा आमच्याकडे कार्यक्रम आहे. कायद्याचे सर्वांनी पालन करा. बेकायदेशीर काही होऊ देऊ नका. मुंबईतील परिस्थिती बिघडली तर त्याला जिहादी कारणीभूत असतील, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला.