संतोष देशमुख प्रकरणात सुरेश धस यांची नवी मागणी, सरपंच परिषदेत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jan 07, 2025 | 4:18 PM

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सुरेश धस यांनी नवी मागणी केली आहे, ते सरपंच परिषदेमध्ये बोलत होते.

संतोष देशमुख प्रकरणात सुरेश धस यांची नवी मागणी, सरपंच परिषदेत नेमकं काय म्हणाले?
Follow us on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आक्रोश आंदोलनं होत आहेत. दरम्यान आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस हे देखील सहभागी झाले आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आजच्या आंदोलनात देखील त्यांनी मोठी मागणी केली आहे. कितीही वेळ जाऊ द्या संतोष देशमुख यांना मनातून उतरू देऊ नका. कितीही वेळ लागला तरी चालेल, आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळून देऊ. आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींना त्याच्या नातेवाईकांना भेटता आलं नाही पाहिजे अशी मोठी मागणीही यावेळी सुरेश धस यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरपंच परिषदेतील आक्रोश राज्यभरात पोहोचला पाहिजे. आरोपींची तेरे नाम सारखी अवस्था करा, अंतुलेनंतर फडणवीस हेच पहिले असे मुख्यमंत्री आहेत की जे सरपंचांच्या मागण्यांकडे लक्ष देत आहेत, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणात सुरुवातीपासूनच सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावर बोलताना त्यांनी अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील आका हा वाल्मिक कराडच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील आरोप केले आहेत, अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत आहेत, ते मुंडे यांना का पाठिशी घालत आहेत असा सवाल देखील देखील धस यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.  आतापर्यंत या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण अजूनही फरार आहे.