योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, पुणे | 18 जानेवारी 2024 : उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा मांडल्यानंतर भाजपाला भीती वाटू लागली आहे. त्यावरुन जनतेचे लक्ष हटविण्यासाठी सुरज चव्हाण यांना अटक केली असून राजन साळवींच्या घरावर धाड टाकली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. कोरोनाकाळात माणसं वाचविण्यास प्राथमिकता होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. ज्यावेळी उत्तर प्रदेश मध्ये प्रेतं तरंगत असतात, गुजरातमध्ये रस्त्यावर प्रेत टाकण्यात आली होती. खरंच खिचडी घोटाळा झाला आहे काय ? मुंबईचे पालिकेचे आयुक्त चहल अजून तिथेच आहेत त्यांना विचारा, टेंडर ज्यांना दिले ते अमेय घोले आता तुमच्या सोबतच आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही ? प्रवीण परदेशी कुठे आहेत. ते कुणाचे निकटवर्तीय आहेत. फडणवीस यांचे तर नाहीत ना ? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे.
देवेंद्रजी आधी तुमचे भाषण ठाकरे मुक्त करुन दाखवा, तुमच्या भाषणाची सुरुवात ठाकरेंपासून ते शेवट ठाकरेंपर्यंत होतो. पीएम फंडाचे काय झालं ? अनेकांनी देणग्या दिलेल्या त्या पीएम केअर फंडाचे काय झालं जर फंड खाजगी तर त्याला पंतप्रधानांचे नाव का दिलं ? त्यावर तुम्ही गप्प का? असा फंड जमा करता येतो का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे. कुटे ग्रुपचे मालक सुरेश कुटे यांच्यावर बीडमध्ये धाड पडली, धाड पडल्यानंतर त्यांनी पाचव्या दिवशी बावनकुळेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला, आणि त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थांबली, यावर व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या का बोलत नाहीत ? असाही सवाल त्यांनी केला. भावना गवळी, यशवंत जाधव हे जर निर्दोष असतील तर यातील किती जणांनी अब्रू नुकसानाची दावा केला आहे किंवा माफी मागण्याची मागणी केली आहे असा सवाल त्यांनी केला.
राजन साळवी यांना भाजपच्या ऑफर आल्या होत्या. मात्र ते निष्ठावंत राहिले, मात्र याआधीही त्यांच्यावर धाडी टाकण्यात आल्या. मात्र काही सापडलं नाही.आदित्य ठाकरेंनी पालिकेच्या भष्ट्राचाराविरोधात मोर्चा काढला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार भाजपसोबत गेले. पंतप्रधानांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला होता, आता पंतप्रधान माफी मागणार का? किंवा दादा पंतप्रधानावर अब्रू नुकसानीचा दावा करणार का ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या हे मदारी आहेत. या मदाऱ्याचा खेळाच्या दोऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत का ? त्यांनी मला सोडलं नसतं, मात्र माझी कोरी पाटी आहे, माझ्या बाईपणावर काही बोलघेवडे बोलत आहेत असेही त्या यावेळी म्हणाल्या. संजय राऊत सत्याचे वाली आहेत, तुमच्या सारखे व्हिडियो त्यांनी केलेले नाहीत. तुम्ही एक निवडणूक ईव्हीएमशिवाय घेऊन दाखवा, मग लोक तुम्हाला तुमची लायकी दाखवतील. आता ईव्हीएमवर विश्वास ठेवू नका, जिथे खाली बसून अंतराळ यान हाताळले जाते. तेव्हा ईव्हीएम काय चीज आहे? इतर देशात ईव्हीएम बंद झाली आहेत असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.